नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्वांच्या नजरा लागलेल्या ५७ गटांच्या आरक्षण सोडतीकडे वळल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे पार पडलेल्या या सोडतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून नव्याने तयार झालेले कोन्होलीबारा आणि सावंगी देवळी हे दोन्ही गट अनुसूचित जमातीसाठी (Scheduled Tribes – ST) राखीव ठेवण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेत मागील निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र यंदाच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आजच्या आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवारांच्या यादीवर मोठा प्रभाव पडणार असून अनेकांची गणितं बदलण्याची शक्यता आहे.
आरक्षण यादी (गटवार):
अनुसूचित जमाती (ST): वाडंबा, बोठीया पळोरा, मनसर, कोन्होलीबारा, सावंगी देवळी, सोनेघाट, महुली, नांद
अनुसूचित जाती (SC): दवलामेटी, चिचोली, चांदकापूर, मांढळ, वायगाव, टाकळघाट, येनवा, वेलतूर, इसासनी, पारडसिंगा
इतर मागासवर्ग (OBC): तारसा, गोंधखैरी, धनला, माकरढोकळा, कोराडी, बोएकेडी फाटक, गोंडेगाव, केळवद, तेल कामठी, वाढोरा, राजोरा, रिधोरा, सिरसी, नागधन, बोकारा
५० टक्क्यांच्या मर्यादेतच आरक्षण लागू
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार आहे. या नियमानुसार अनुसूचित जातीसाठी १०, अनुसूचित जमातीसाठी ८ आणि इतर मागासवर्गीयांसाठी १० गट आरक्षित राहतील. उर्वरित २९ गट सामान्य प्रवर्गासाठी खुले असतील.
दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य पणाला
या सोडतीमुळे अनेक माजी पदाधिकाऱ्यांच्या राजकीय गणितांवर परिणाम होणार आहे. माजी अध्यक्षा मुक्ता कोकडे, माजी उपाध्यक्षा कुंदा राऊत, माजी सभापती राजकुमार कुसुंबे, सभापती मिलिंद सुटे, भाजपचे काटोल जिल्हाध्यक्ष कुंभारे तसेच सलिल देशमुख, आतीष उमरे, उज्वला बोढारे, दुधराम सव्वालाखे, व्यंकट कारेमोरे यांच्यासाठी ही सोडत निर्णायक ठरणार आहे. काहींचे गट आरक्षणात गेल्याने त्यांना नव्याने मैदानात उतरावे लागणार असून, काहींच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजकीय हालचालींना वेग आला असताना, येत्या काही दिवसांत प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जाणार असून, इच्छुक उमेदवारांची यादी अंतिम स्वरूपात पुढे येईल.