नागपूर : हिलटॉपचा परिसर सोमवारी दोन आत्महत्यांनी हादरला. हिलफोर्ट शाळेपासून अवघ्या हाकेच्या अंतरावरील होस्टेलवाला इमारतीतल्या वसतिगृहात दुसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या एका मुलाने अभ्यासाच्या ताणातून गळफास घेऊन जीवन संपवले. आई बाबा मला झेपत नाही, अशी चिठ्ठी या विद्यार्थ्याने मागे सोडल्याने पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे मुलांसाठी जीवघेणे ठरत असल्याची धक्कादाय बाबही समोर येत आहे. दुसऱ्या एका घटनेत वसतिगृहापासून तिसऱ्याच गल्लीत राहणाऱ्या एका विवाहितेनेही पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. लता आशीष कोहळे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर ख्वाहिश देवराम नागरे (१६) असे मृत मुलाचे नाव आहे.

गळफास लावून आत्महत्या केलेला ख्वाहिश हा कॅनल रोडवरील एका खासगी शिकवणी वर्गाचा विद्यार्थी होता. मूळचा बालाघाट येथील रहिवासी ख्वाहिश हा गेल्या काही महिन्यांपासून हिलटॉप परिसरातल्या होस्टेलवाला नावाच्या इमारतीतल्या वसतिगृहात राहत होता. आत्महत्येच्या आठ दिवसांपूर्वीच तो बालाघाटवरून परत आला होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून तो तणावामुळे सोबतच्या मुलांशी फारसा बोलत नव्हता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली.

शैक्षणिक वर्तूळात खळबळ

खासगी शिकवणी वर्गात शिकणारा विद्यार्थी शहराच्या मध्यवर्ती भागात रहात होता. मध्य प्रदेशातील बालाघाट सारख्या आदिवासी भागातून आलेला ख्वाहिश देवराम नागरे (१६) हा गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता. मला अभ्यास झेपत नाही, असेही तो सोबतच्या मित्रांशी बोलताना म्हणाला होता. मात्र मुलांनी त्याचे बोलणे फारसे मनावर घेतले नाही. शिवाय तो गळफास लावण्याच्या आठ दिवसांपूर्वी बालाघाट येथील घरी देखील जाऊन आला होता. मात्र तेथून परतल्याच्या काही दिवसांतच त्याने जीवन संपविल्याने शैक्षणिक वर्तूळात खळबळ उडाली आहे.

दुसऱ्या घटनेत, राणी दुर्गावती चौक परिसरात सासर असलेली लता कोहळे ही विवाहिता आठ दिवसांपूर्वी हिलटॉप येथे माहेरी परत आली होती. वसाहतीतील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार लता हिचा पती आशीष एका बँकेत नोकरी करतो. नऊ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना ७ वर्षांची रुही आणि ५ वर्षांचा तनिष्क अशी दोन अपत्ये आहेत. लताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार आशीष त्रास देत असल्याने लता इंदोरा येथील एका समाजकार्य महाविद्यालयात सफाईची कामे करून मुलांचा सांभाळ करीत होती. आशीषचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. अंबाझरी पोलिसांनी या दोन्ही घटनांची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून घेत तपास सुरू केला आहे.