नागपूर : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान आमदार नाना पटोले यांनी एक गंभीर आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दा उपस्थित करत राज्याच्या राजकारणात नवी चर्चा रंगवली आहे. एका कंपनीतील ९९ टक्के शेअर्स जर एखाद्या व्यक्तीकडे असतील, तर त्या कंपनीतील आर्थिक, प्रशासकीय किंवा इतर कोणत्याही गैरव्यवहारांपासून तो स्वतःला पूर्णपणे दूर ठेवू शकत नाही. या पार्श्वभूमीवर “अशा स्थितीत मग तो दोषी का ठरत नाही?” असा थेट प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला आहे. याविषयीचे सत्य आम्ही आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मांडणार आहोत, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.

नाना पटोले यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी सांगितले की, कंपनीत बहुसंख्य मालकी हक्क असताना संचालक मंडळातील निर्णय, व्यवहार, आर्थिक हालचाली याबद्दल माहिती नसल्याचा दावा मान्य होऊ शकत नाही. “९९ टक्के शेअर्स म्हणजे जवळजवळ कंपनीवर पूर्ण नियंत्रण. अशा व्यक्तीला कंपनीतील प्रत्येक कृतीची जबाबदारी घ्यावीच लागते. पण काही जण स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम आहे,” असे पटोले म्हणाले.

हे मुद्दे ते आगामी विधानसभा अधिवेशनात ठळकपणे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही तथ्यांसह संपूर्ण माहिती समोर आणणार आहोत. कोणत्याही व्यक्तीचं संरक्षण करणे आमचा हेतू नाही. सत्य जे आहे ते सांगणे आणि राज्यातील भ्रष्टाचार उघड करणे ही आमची जबाबदारी आहे,” असे पटोले यांनी नमूद केले.

पटोले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ते नेमके कोणत्या कंपनीचा किंवा कोणत्या नेत्याचा उल्लेख करत आहेत, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांवर थेट आरोप न करता मुद्दा ‘सिस्टेमिक अकाउंटेबिलिटी’कडे वळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे काही विश्लेषकांचे मत आहे. तर काहींच्या दृष्टीने हे विधान आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एका मोठ्या राजकीय धक्क्याची चाहूल देणारे आहे.

नाना पटोले यांनी यापूर्वीही राज्यातील विविध गैरव्यवहारांबाबत आवाज उठवला आहे. “जनतेच्या पैशाचा गैरवापर, सत्तेचा दुरुपयोग आणि आर्थिक अनियमितता कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही,” असा त्यांचा ठाम भूमिकेचा पुन्हा एकदा प्रत्यय यानिमित्ताने आला आहे. आता पटोले विधानसभा सभागृहात कोणती माहिती मांडतात, त्याचा कोणावर किती परिणाम होतो आणि राज्याच्या राजकीय वातावरणात नवी वादळे उठतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.