अमरावती : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्‍या लोकांमधून येत आहेत. भुजबळ स्वतः नाराज नसून नियमित पक्षीय बैठकांना येतात, असा दावा राज्‍याचे अन्‍न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. नरहरी झिरवळ म्‍हणाले, छगन भुजबळ हे ज्‍येष्‍ठ नेते आहेत. एवढे अनुभवी, ओबीसींचे नेते, त्‍यांना एवढे कशामुळे थांबावे लागले असेल, कदाचित तडजोडीत कुठे अडचण आली, म्‍हणून थांबावे लागले असेल. पण लोकांमधूनच ते नाराज आहेत, असे सांगितले जात आहे, मुळात ते नाराज नाहीत. छगन भुजबळ हे प्रत्‍येक कार्यक्रमांना हजर असतात, अजित पवार यांच्‍या निवासस्‍थानी सर्व आमदारांची बैठक असते, तेव्‍हा ते आवर्जुन हजर असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्री धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असे उत्तर देत यावर झिरवळ यांनी अधिक भाष्य करणे टाळले. तथापि केवळ आरोप झाले म्हणून राजीनामा घेतल्या जात नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली. अन्‍न व औषधी प्रशासन विभागाकडे मनुष्यबळ नसल्याने त्याचा एकूणच कामकाजावर परिणाम होत असल्याची कबुली नरहरी झिरवळ यांनी दिली. राज्य लोकसेवा आयोगामार्फत १९० पदे भरण्यात येत असून भेसळ तपासण्यासाठी विभागनिहाय प्रयोगशाळा स्थापन करण्यात येत असल्याचे त्‍यांनी सांगितले.

अन्न व औषधी विभागाकडे राज्यभरात मनुष्यबळ पुरेसे नाही. राज्याच्या सर्वच विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९० पदे भरण्यात येत आहेत. मात्र त्यातूनही रिक्त पदांचा प्रश्‍न सुटणार नसल्याने आणखी भरतीसाठी आग्रह असणार आहे. या विभागातील पदे तांत्रिक स्वरूपातील असल्याने बाह्य यंत्रणेमार्फत भरता येत नसल्याची अडचणही त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

राज्यभरात गुटखा बंदी असली तरी हा व्यवसाय स्थानिक पातळीपर्यंत फोफावला असल्याची कबुली देतानाच ते म्हणाले, कारवाईसाठीही आमच्याकडे मनुष्यबळ नाही. तसेच गुटखा विक्रेत्यांविरूद्ध कारवाई कोणी करावी यावर बोलताना ते म्हणाले, पोलीस व अन्न औषधी प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने कारवाई कुणी करावी हे स्पष्ट नाही. त्यासाठी आता कायद्यात बदल करावा लागणार आहे. विक्रेत्यांविरूद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडणार आहे.राज्यात प्रयोगशाळांची कमतरता असल्याचे कबूल करीत ते म्हणाले, चाचणीचा अहवाल लवकर यावा व कारवाई करता यावी दृष्टीने विभागनिहाय प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे. नागपूर व नाशिक येथील प्रयोगशाळेचे काम सुरू असून येत्या दोन महिन्यांत लोकार्पण करण्यात येईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narhari jirwal claimed bhhagan bhujbal is not unhappy and attends party meetings regularly mma 73 sud 02