नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेचे अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत अधिवेशनाला शनिवार सुट्टी असल्याने ते शुक्रवारी सायंकाळी दिल्लीहून नागपूरला विमानाने परतले, त्याच विमानात त्यांच्या मागच्या आसनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार बसले होते.
शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे आयोजित मंडल यात्रेसाठी नागपुरात शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले.
विमानतळाबाहेर निघताना दोन्ही नेते काही मिनिटांच्या अंतराने मागे-पुढे बाहेर पडले. यावरून दोन्ही नेत्यांच्या एकत्र विमान प्रवासाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. काहींनी दावा केला दोन्ही नेते प्रवासात आजूबाजूच्या सीटवर बसले व चर्चा करत नागपुरात पोहोचले, तर शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या व बिझनेस क्लासमध्ये दोनच सीट असल्यामुळे ते पूर्ण प्रवासात पत्नीसोबतच बसले होते, असाही दावा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ओबीसी सेलतर्फे आज क्रांती दिनी राज्यभर मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार हिरवी झेंडी दाखवणार आहेत. ही यात्रा आशिर्वाद लॉन, सीताबर्डी येथून दुपारी साडेबाराला निघेल. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील.
या यात्रेसाठी शरद पवार यांचे शुक्रवारी दुपारी विमानतळावर आगमन झाले.
मंडल आयोगाची अंमलबजावणी ही ओबीसींच्या जीवनातील सर्वात मोठी सामाजिक परिवर्तन घडविणारी बाब ठरली. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मंडल आयोग राज्यात सर्वप्रथम लागू केला होता. शरद पवार यांनी ओबीसीसाठी काय केले, याची माहिती राज्यातील जनतेला व्हावी यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे.
मंडल आयोग राज्यात सर्वप्रथम लागू करून शरद पवार यांनी ओबीसी समाजाला अधिकृत व हक्काचे आरक्षण मिळून दिले. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील सर्वच विरोधी पक्ष करीत होते. परंतु, भाजपने याला विरोध केला. दबाव वाढल्याने केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले. परंतु, ही जनगणना कधी करणार याची मात्र, कोणतीही घोषणा केली नाही. भाजपचे ओबीसीविरोधी धोरण आणि शरद पवार यांनी ओबीसी समाजासाठी केलेले कार्य हे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी ही मंडल यात्रा काढण्यात येत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ११ जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे असे सलिल देशमुख यांनी सांगितले.