नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघातील  जनतेने तिसऱ्यांदा निवडून दिले.  त्यांनी दिलेल्या  भरभरून प्रेमाची  येत्या पाच वर्षात परतफेड करणार, असे  मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.गडकरी यांचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी त्यांचे नागपुरात आगमन झाले. विमानतळावर त्यांचे स्वागत केल्यानंतर ते  प्रसार माध्यमांशी बोलत होते. जनतेने मला जे प्रेम दिले आहे त्याची कामाच्या रुपात येत्या पाच वर्षात परतफेड करणार आहे. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवत मला तिसऱ्यांदा निवडून दिल्यामुळे मला केवळ नागपूरचा नाही तर देशाचा विकास करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे त्यांचे आभार मानत येत्या पाच वर्षात दुप्पट काम करणार असल्याचे गडकरी म्हणाले. 

सात वर्ल्ड रेकॉर्ड आतापर्यंत माझ्या विभागाने केले आहे. आणखी पुढे काम करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास राजकीय नेता म्हणून हे पुंजी असते. मी भाग्यवान आहे की तिसऱ्यांदा नागपूरच्या जनतेने मला निवडून दिले. जात पंथाच्या आधारे मी कधी राजकारण केले नाही. सर्वांचा साथ सर्वांचा विकास या आधारावर मी राजकारण केले. नागपूरच्या जनतेचे प्रेम कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी जो प्रेमाने विश्वास दाखवला तो पुढल्या काळात यापेक्षा अधिक काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी म्हणाले.

हेही वाचा >>>निवडून येताच प्रतिभा धानोरकरांनी दिला राजीनामा, आता नवीन जबाबदारी

धामना येथील घटना दुर्भाग्यपूर्ण घटना आहे.  त्या घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नक्कीच दुःख झाले आहे. त्यामुळे मी विनंती केली होती या घटनेमुळे कुठलेही  स्वागत समारंभ, जल्लोश किंवा मिरवणूक काढू नये. मी मृतकांच्या आत्म्यांना शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

आवाहन झुगारून कार्यकर्ते विमानतळावर

धामना येथील घटनेमुळे स्वागत समारंभ व मिरवणूक रद्द करावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते.मात्र ते झुगारून  विमानतळावर शेकडो कार्यकर्ते स्वागतासाठी आले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानी घोषणा देत गडकरी यांचे स्वागत केले.