नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. शनिवारी नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एन. ए. डी. टी.)च्या स्थापना दिवस कार्यक्रमात त्यांनी राजकीय पक्षाच्या रॅलीत जमणाऱ्या गर्दीबाबत महत्वाचे विधान केले. नितीन गडकरी नेमके काय म्हणाले? हे आपण जाणून घेऊ या.
नितीन गडकरी म्हणाले, मला एकूण १४ डी.लिट. मिळाल्या आहे. त्यापैकी ७ डी.लिट. या कृषी विज्ञान विषयातील आहेत. मागे विदर्भातील शेतकऱ्यांना घेऊन स्पेन या देशात गेलो होतो. तेथील व्हेलेंशिया या भागातील संत्री जगप्रसिद्ध आहे. येथे चार दिवस शेतकऱ्यांसोबत वेगवेगळ्या भागाची पाहणी करून तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एक कार्यशाळा घेतली. दरम्यान आमचे ॲग्रोव्हिजन नावाचा एक उपक्रम आहे. त्याला प्रत्येक वर्षी ५ लाख शेतकरी भेट देतात. या ॲग्रोव्हिजनतर्फे शेतकऱ्यांना संत्रातील नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी शेतकऱ्यांना फुकट देऊ नका, त्याची संबंधिताला फारशी किंमत राहत नाही. २५० रुपये घ्या, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचे महत्व कळेल, असा निर्णय घेतल्याचे गडकरी म्हणाले.
दरम्यान गडकरी पुढे म्हणाले, आमच्या राजकीय पक्षाच्या रॅलीत मोठी गर्दी जमते. बसमध्ये भरून- भरून लोक येतात. येथे जेवण नि:शुल्क असते. त्यामुळे लोकांना आमच्या भाषणात जास्त स्वारस्य राहत नसून कधी बसमध्ये बरून परत जायचे याबाबत जमावाला चिंता राहते, असेही गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रीबाबतच्या कार्यशाळेत पैसे घेऊन ६५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांना इस्त्रायल व स्पेनमधील संत्री उत्पादनाच्या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. त्याचा फायदा होत असून विदर्भात मोठ्या संख्येने शेतकरी संत्री उत्पादनाच्या तंत्रज्ञानात बदल करत आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत विदर्भातील संत्र्याचे उत्पादन तीन ते चार पटींनी वाढण्याची आशा नितीन गडकरी यांनी वर्तवली. कार्यशाळा व प्रशिक्षणामुळे आता येथील वृक्षांच्या नर्सरीसह इतरही तंत्रज्ञानात खूप सुधारणा व संशोधन होत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
अहंकार महत्वाचा नाही…
काही लोक मला खूप समजते, अशा भावात वागतात. हा अहंकार योग्य नाही. ज्ञान महत्वाचे आहे. सहकाऱ्यांशी समन्वय नसल्यास काम पूर्ण होत नाही. नेतृत्व करणारा नेता वा अधिकारी एकटा काम करू शकत नाही. सामुहिक प्रयत्नातूनच चांगल्या पद्धतीने काम होऊ शकते, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
जात पात मानत नाही…
मी जात- पात मानत नाही. मागे निवडणूकीदरम्यान मी जो जात- पातची गोष्ट करणार त्याला लात मारणार असे म्हणालो. त्यावर प्रसिद्धीमाध्यमांमध्ये बातमी आल्यावर एका पत्रकाराने मराठा आंदोलन जोरात असल्याने जरांगे पाटील यांना प्रश्न विचाला. परंतु त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. मी संपूर्ण नागपुरकरांना आपला परिवार मानत असल्याचेही गडकरी म्हणाले.
