नागपूर : नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे री-कार्पेटिंग आणि देखभाल-दुरुस्तीचे काम भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दीड वर्षे लांबवले, त्यामुळे नागपूरकरांना जवळपास ५० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची तीव्र टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. विशेष म्हणजे, ही टीका त्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोरच केली.
“रोल ऑफ सेक्टर इन विकसित भारत” या विषयावर नागपूरमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी गडकरींनी विमानतळ प्राधिकरणाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “जुनाट आणि कालबाह्य नियमांवर आधारलेली कार्यपद्धती व संथगतीने चालणारी कामे ही या यंत्रणेची ओळख झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली.
गडकरी म्हणाले, “एक एअर स्ट्रिप बनवायला दीड वर्ष लागणे हास्यास्पद आहे. या विलंबामुळे नागपूरकरांना प्रवासात अडचणी, वाढीव भाडे आणि वेळेची नासाडी सहन करावी लागली. अंदाजे ५० कोटींचे नुकसान झाले आहे.”
त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून स्पष्ट शब्दांत सांगितले, “तुम्हाला फाईलवर बसण्याची सवय लागली आहे. निर्णय घेत नाहीत, फक्त टेबलवर ढकलत राहतात. माझे मंत्रालय — नॅशनल हायवे — एका दिवसात ४० किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करते, आणि आम्ही ७ वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. पण एका धावपट्टीच्या री कार्पेटिंग साठी दीड वर्ष लागते, हे खपवून घेतले जाणार नाही.”
गडकरी यांनी विमानतळ अधिकाऱ्यांची “खरडपट्टी” काढल्याचेही उघड केले. “कामात झालेल्या विलंबाचे कारण देताना ‘गडकरी आणि फडणवीसांचे निवडणूक खासगी विमान’ ही कारणे दिली जातात, हे अत्यंत खेदजनक आहे,” असे ते म्हणाले.
शेवटी, त्यांनी युरोप-अमेरिकेप्रमाणे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून, सुरक्षा नियमांचे पालन करत वेगवान आणि पारदर्शक कामकाज करण्याचे आवाहन केले. “काळानुरूप नियम बदलणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.