नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. शनिवारी नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एन. ए. डी. टी.)च्या स्थापना दिवस कार्यक्रमातही त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागातील प्रामाणिक सेवा न देणाऱ्या आळशी अधिकाऱ्यांची प्रशिक्षण केंद्रात वर्णीबाबत महत्वाचे वक्तव्य केले. गडकरी नेमके काय म्हणाले? त्याबाबत आपण जाणून घेऊया.

कार्यक्रमाला प्रामुख्याने एनएडीटीचे महासंचालक एस. के. मॅथ्यूज, आयकर लवाद प्राधिकरण -आयटीएटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग, न्यायमुर्ती बी. एम. श्यामप्रसाद आणिइतरही पाहूणे प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले, मंत्री म्हणून विविध विभागातील सचिव बऱ्याचदा एक, दुसऱ्या अधिकाऱ्याबाबत म्हणतात, की हा माणून कामाचा नाही. त्यावर आम्ही म्हणतो त्याचे काय करावे. तर सचिव म्हणतात की प्रशिक्षण केंद्रात पाठवून देऊ. पोलिसांसह इतरही काही विभागात असे होते. त्यामुळे प्रशिक्षण केंद्राकडे चांगल्या नजरेने बघितले जात नाही. परंतु तसे नाही.

मी प्रशिक्षण केंद्रात चांगले अनुभवी निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना घेण्याबाबत सल्ला दिला होता. त्यातून या अधिकाऱ्याचा नवोदित अधिकाऱ्यांना लाभ शक्य असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असून ज्या प्रमाणात राजस्व संकलन होईल तेवढ्या प्रमाणात लोक कल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध होतो. त्यामुळे भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांचे लोककल्याणकारी अर्थव्यवस्थेतील योगदान महत्त्वाचे आहे असेही गडकरी यांनी सांगितले.

सहकाऱ्यांमध्ये समन्वय, सहकार्याने संवादातून तुम्ही यशस्वी होत असतात. या प्रशिक्षणातून हे शिकण्यासारख आहे. विद्वत्ते सोबतच प्रसंगावधान,व्या वहारिकता निर्णय क्षमता, पारदर्शकता महत्त्वाची आहे. यासाठी प्रशिक्षण आणि प्रबोधन आवश्यक आहे. अनुभवी अधिकाऱ्यांच्या प्रशासनातील अनुभवाचा उपयोग प्रशिक्षणासाठी करण्याच त्यांनी सुचवले .

फाईल्स प्रलंबित ठेवल्यास मोठे नुकसान

निर्णय क्षमता जलद प्रक्रियेने राबवावी त्यामुळेच प्रकल्प मार्गी लागतात. फाईल्स आणि कामे प्रलंबित ठेवल्याने कंत्राटदार आणि इतर हितधारकांचेच नुकसान होते. वित्तीय मूल्यांकन तर आवश्यक आहेच सोबतच कार्याचे देखील मूल्यमापन होणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले.

कोलकाताच्या डायरेक्ट टॅक्स स्टाफ कॉलेजचे रूपांतर एनएडीटी…

अकादमीचे संचालक एस. के. मॅथ्यूज यांनी अकादमीचा इतिहास मांडला. १९५७ ला कोलकाताच्या डायरेक्ट टॅक्स स्टाफ कॉलेजचे रूपांतर राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी मध्ये नागपूरला झाले. तेव्हापासून ही अकॅडमी नागपूर मध्ये कार्यरत आहे. सध्या या अकॅडमीमध्ये १२८ भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी आणि २ रॉयल भूतान सर्विस मधील अधिकारी प्रशिक्षण घेत आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून इंडियन रेव्हेन्यू सर्विस (आयकर ) च्या अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षित केले जात असल्याचे मॅथ्यूज यांनी सांगितले.