नागपूर : उत्तर नागपूरचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या “दुबार मुस्लिम मत” या आरोपांना आज पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले. त्यांनी हा आरोप प्रत्यक्ष पुराव्याशिवाय केलेला राजकीय दुष्प्रचार आणि जनतेच्या विवेक, सामाजिक ऐक्य तसेच घटनेवरील विश्वासाला आव्हान निर्माण करणारा म्हणत भाजप वर प्रखर टीका केली आहे.
डॉ. राऊत म्हणाले, मतदारयादीचे काम संपूर्णपणे निवडणूक आयोगाकडे आहे. कोणत्याही राजकीय व्यक्ती मग तो आमदार असो वा खासदार असो किंवा पक्ष त्यांचा यावर हस्तक्षेप नसतो. जर भाजपकडे कोणतेही पुरावे असतील तर ते निवडणूक आयोगाकडे द्यावे हेच लोकशाहीचे खरे मार्गदर्शन आहे. भाजप सरकारचा मंत्री आरोप करतो म्हणजे त्यांनीच आपल्या सरकारच्या अधिपत्याखाली गैरप्रकार होत असल्याची कबुली दिली आहे. निवडणूक आयोग गप्प आहे, शांत आहे पण भाजपची अस्वस्थता हे त्यांच्या असुरक्षिततेचे लक्षण आहे. दलित, ओबीसी, शोषित आणि अल्पसंख्याक समाज जेंव्हा एकत्र येतो, तेंव्हा भाजपला ‘व्होट जिहाद’ दिसतो, ही त्यांची कृती घाबरण्याचीच नव्हे तर संविधानद्रोही मानसिकतेची खूण आहे.
मतदाराचा धर्म अथवा जात नसून तो नागरिक म्हणून नोंदला जातो. प्रत्येक मत समान आहे. मग ते हिंदू, मुस्लिम, दलित किंवा ओबीसीचे असो. देश समतेच्या आणि संविधानाच्या घटनेवर उभा आहे. गेल्या दहा वर्षांपासून देशाचे प्रशासन भाजपच्या ताब्यात आहे. डुप्लिकेट मते, चुकीची नावे यास जबाबदार भाजप प्रशासन आहे. विरोधी पक्ष नव्हे.
गडबड कुणी केली हे जनतेला माहीत आहे. भाजप नेते आमच्यावर ‘व्होट जिहाद’चा आरोप करत नागपूरच्या सामाजिक ऐक्यात फूट पाडायचा प्रयत्न करत आहे. पण उत्तर नागपूरचा मतदार धार्मिक नव्हे, तो भारतीय संविधानाशी एकनिष्ठ आहे. आम्ही मतांचा नव्हे, तर विचारांचा लढा लढतो. विचार आजही काँग्रेसच्या बाजूने आहे, आमचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत आहे.
जनता भीक मागत नाही तर न्याय मागते. ही मते विकत नाही, ती संविधानाच्या विश्वासावर मतदान करतात. उत्तर नागपूरचा नागरिक जागा, स्वाभिमानी आहे. भाजपचे खोटे आरोप, सामाजिक ऐक्यात फूट पाडण्याचे डावपेच व संविधानाचे अवमान तो कधीही सहन करणार नाही. मंत्री आशिष शेलार म्हणाले होते की उत्तर नागपूरमध्ये ८३४२ दुबार मुस्लिम मते आहे आणि माझं नाव घेतले. हा आरोप केवळ राजकीय दुष्प्रचारच नव्हे तर केवळ धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा आणि याद्वारे निवडणूक पूर्व धार्मिक तूष्टीकरणाचा स्पष्ट पण जाणून बुजून करण्याचा प्रयत्न आहे.
खरं पाहिलं तर मतदार यादी तयार करण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं आहे नागरिकांच नाही. मग शेलार साहेब सांगोत, अथवा त्यांचे नेते, भाजप सरकार असताना ‘वोट चोरी’ होत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? हे तर त्यांनी स्वतःच्या सरकारकडून होत असलेल्या मतचोरीची कबुलीच दिली आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, शेलार यांचे वक्तव्य हे भारतीय दंड संहिता कलम १५३ए, २९५ए, आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १२३(३) अंतर्गत “धार्मिक आधारावर मत मागणे किंवा तिरस्कार पसरवणे” या गुन्ह्याच्या चौकटीत मोडते.
‘मुस्लिम मत’, ‘दलित मत’ वर्गीकरणातून संविधानाचा अपमान
आणखी एक प्रश्न निवडणूक आयोग शांत आहे, मग भाजपचे मंत्रीच एवढे का बोलतात? कारण त्यांना लोकशाहीची नव्हेतर लोकांच्या एकतेची भीती वाटते. मतदार हे धर्म, जात यापेक्षा नागरिक म्हणून नोंदलेले असतात आणि ‘मुस्लिम मत’, ‘दलित मत’ असे वर्गीकरण करणं संविधानाचा अपमान आहे. देशाचे मतदार धार्मिक नाही तो संविधाननिष्ठ नागरिक आहे. हा लढा धर्माचा नाही, विचाराचा आहे. नागरिक मते विकत नाही, ती संविधानाच्या विश्वासावर देतात.
