लोकसत्ता टीम नागपूर : अनेक वर्षांपासून रखडलेली जिल्हा नियोजन भवनाचे काम अखेर पूर्ण झाले. नागपुरातील वास्तू कलेच्या लौकिकाला साजेशी अशी ही वास्तू असून शुक्रवारी नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेश फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. नवीन जिल्हा नियोजन भवनात पहिल्या माळ्यावर जिल्हा नियोजन अधिकारी, नागपूर यांचे कार्यालय, सभागृहात व्यासपीठावर २८ मान्यवरांची आसन व्यवस्था व अधिकारी/प्रतिनिधी व इतर गणमान्य व्यक्तीकरिता २९४ आसन व्यवस्था आहे. दुसऱ्या माळ्यावर सभागृहाची व्यवस्था आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकरी व जिल्हा नियोजन अधिकारी यांना स्वतंत्र दालने या ठिकाणी आहेत. तळ माळ्यावर प्रतीक्षालय व दुसऱ्या माळ्यावर ग्रंथालयाची व्यवस्था आहे. नियोजन भवनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ ऑगस्ट रोजी होत आहे. इमारतीच्या लोकार्पणानंतर लगेचच जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारी ही बैठक असल्याने त्यात विविध मुद्यांवर सत्ताधारी व विरोधीपक्षाच्या सदस्यांमध्ये वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा-अमित ठाकरेंकडून जय मालोकारच्या कुटुंबाचे सांत्वन; म्हणाले, ‘मी राजकारण…’ शासकीय योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप लोकार्पणापूर्वी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे प्रमाणपत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत केले जाणार आहेत. यात जिल्ह्यातील ५ लाभार्थ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत बागायती/ कोरडवाहू शेतीचे वाटप, स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील पात्र लाभार्थ्यांला १५ टक्के निधी लाभ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत दोन तृतीयपंथीयांना प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूकीचे आदेश, शिवभोजन थाळी केंद्राचे तृतीयपंथीयाला वाटप, जिल्ह्यातील तालुकास्तरावरील १४ ठिकाणच्या तालुका कामगार सुविधा केंद्राचे लोकार्पण, अग्निशमन वाहन, किडा संकुल येथे कबड्डी, खो-खो खेळासाठी मॅट पुरविणे, नझूलपट्टा वाटप केले जाणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे संचालन करणार आहेत. आणखी वाचा-अमरावती जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांबाबत दुजाभाव; आमदार यशोमती ठाकूर यांचा आरोप नागपूर कॉफी टेबल बुकचे अनावरण नागपूर जिल्हा व महानगराला एैतिहासिक वारश्यासह विपूल नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेली आहे. या समृध्दीसह महानगरातील एैतिहासिक किल्ला, श्रीमंत भोसले यांचा राजवाडा, विधानभवन, मा. उच्च न्यायालय, जनरल पोस्ट ऑफिस, विभागीय आयुक्त कार्यालय, राजभवन, भारतीय रिजर्व्ह बँक, दीक्षाभूमी आदी स्थळांच्या प्रेरणेला अधोरेखित करणारे ह्दयस्थ नागपूर या कॉफी टेबल बुकचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉफी टेबल बुक साकारलेले आहे.