नागपूर : महाराष्ट्रात मराठीचा वणवा पुन्हा एकदा पेटला आणि यावेळी तो चांगलाच पेटला. सणासुदीला लोकांच्या तोंडात गोडवा विरघळवणाऱ्या कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटपर्यंत तो जाऊन पोहोचला आहे. म्हणूनच आता हे चॉकलेट नवीन मराठी रुपात आले आहे आणि त्याचा गोडवा आणखी वाढला आहे.
महाराष्ट्रात मराठीच…
या आंदोलनात आता सणासुदीला तोंड गोड करणारी कॅडबरी डेअरी मिल्कही उतरलीये की काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कॅडबरी चॉकलेटचे नवीन रुप असेच काहीतरी सांगत आहे. हो, “जरा जरा मराठी…” म्हणत कॅडबरी आता मराठी शिकवू लागली आहे. कॅडबरीच्या नवीन रॅपरवर इंग्रजी आणि मराठी संवादाची छोटी छोटी वाक्य लिहिण्यात आली आहेत. कॅडबरीच्या या उपक्रमाचे लोकांकडून कौतुक होत आहे. “तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम राहा, जग तुमची दखल नक्की घेईल ” अशी भूमिका मनसे नेते राज ठाकरे यांनी घेतली होती. कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटच्या या बदलानंतर काहींनी राज ठाकरेंच्या भूमिकेचाही उल्लेख केला आहे.
“कॅडबरी” च्या नव्या वेष्टनावर काय..?
‘जरा जरा मराठी…’, ‘थैंक यू – धन्यवाद’, ‘व्हॉट? – काय’, ‘हाऊ आर यू? – कसे आहात?’, ‘सॉरी – माफ करा’, ‘नीड हेल्प – मदत हवी का?’, लिटल – जरा’, ‘इव्हिनिंग – संध्याकाळ’ असे इंग्रजी आणि त्याला पर्यायी मराठी शब्द लिहिले आहेत. मराठीला प्रोत्साहन देणाऱ्या कॅडबरीच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळानेही डेअर मिल्कला “मंडळ आभारी आहे..” म्हणत प्रतिसाद दिला आहे. काहींनी खूप चांगला उपक्रम असल्याचे म्हटले आहे.
‘युजर’च्या च्या प्रतिक्रिया काय..?
‘तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम राहा, जग तुमची नक्कीच दखल घेईल हे राज ठाकरे यांचे वाक्य आठवल्याचे एकाने म्हंटले आहे. कॅडबरी डेअरी मिल्क यांनी एक अनोखा असा छोट्या रूपात का होईना पण मराठी शिकवण्यासाठी एक गोड उपक्रम राबवला आहे. यासाठी डेअरी मिल्कचे नक्कीच तोंडभरून कौतुक केले पाहिजे’ असेही एकाने म्हंटले आहे. राज्य सरकारनेही मराठीच्या संवर्धनासाठी असे उपक्रम राबवले पाहिजे असे एकाने सूचवले आहे. महापालिकांनी आपल्या जाहिरातीतून असे उपक्रम राबवले पाहिजेत. तसेच मराठी व्यावसायिकांनी देखील आपल्या उत्पादनांवर केले पाहिजेत, असेही एकाने म्हंटले आहे.
कॅडबरी कुणाचा ब्रॅन्ड आहे..?
कॅडबरी डेअरी मिल्क हा कॅडबरी द्वारे उत्पादित केलेला मिल्क चॉकलेटचा एक ब्रिटिश ब्रँड आहे . हा बार जॉर्ज कॅडबरी ज्युनियर यांनी विकसित केला होता आणि १९१४ पर्यंत तो कंपनीचा सर्वाधिक विक्री होणारा उत्पादन बनला होता. हे चॉकलेट आता चीन , भारत , श्रीलंका , पाकिस्तान , फिलीपिन्स , इंडोनेशिया आणि बांगलादेशसह अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे .