अमरावती : दिवसेंदिवस तरुणाई ही समाजमाध्‍यमांच्या आहारी जाताना दिसत आहे. यामध्ये आता किशोरवयीन मुलांचा देखील समावेश झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, ही सवय जीवघेणी ठरू लागली आहे. अचलपूर तालुक्‍यातील एका गावातील १५ वर्षीय मुलीने सव्‍वा वर्षांपूर्वी केलेल्‍या आत्‍महत्‍येचे गूढ उकलण्‍यात पोलिसांना यश आले आहे.

समाजमाध्‍यमावरून प्रेमात पडलेल्‍या या मुलीला प्रियकराने आत्‍महत्‍या करीत असल्‍याची चित्रफित पाठवली. ते एक नाटक होते, पण या युवतीने खरोखरच गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याचे पोलिसांच्‍या तांत्रिक तपासातून समोर आले आहे. अचलपूर तालुक्यातील या १५ वर्षीय मुलीने २५ नोव्‍हेंबर २०२१ रोजी आत्‍महत्‍या केली होती. घटनेच्‍या सव्‍वा वर्षांनंतर परतवाडा पोलिसांनी उत्‍तरप्रदेशातील कानपूर जिल्‍ह्यातील अकबरपूर येथील एका युवकाच्‍या विरोधात आत्‍महत्‍येस प्रवृत्‍त केल्‍याचा गुन्‍हा दाखल केला. पोलिसांनी सुरूवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करून तपास सुरू केला होता.

हेही वाचा >>> शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत कॉंग्रेसच्या निर्णयाआधीच ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज

मृत मुलीच्‍या समाजमाध्‍यमांवरील संदेशांचे निरीक्षण करण्‍यात आले. त्‍यासाठी व्‍हॉट्स अॅप आणि फेसबुकशी देखील इ-मेलच्‍या माध्‍यमातून पत्रव्‍यवहार करण्‍यात आला. त्‍या मुलीसोबत संवाद साधणारी व्‍यक्‍ती अस्तित्‍वात असल्‍याची पुरेशी खात्री झाल्‍यानंतर परतवाडा पोलिसांनी उत्‍तर प्रदेश पोलिसांच्‍या मदतीने संबंधित युवकाचा शोध घेतला. सुरूवातीला पोलिसांनी बेभापती नामक युवकाच्‍या वडिलांशी संपर्क केला, त्‍यानंतर नावानिशी युवकाच्‍या विरोधात आत्‍महत्‍येस प्रवृत्‍त केल्‍याचा गुन्‍हा दाखल केला.

हेही वाचा >>> नागपूर : आता काय बोलावं? विज्ञान काँग्रेसमध्ये सहभागींना कोऱ्या प्रमाणपत्रांचे वाटप

आरोपी बेभापती लालाराम या तरूणाने मुलीशी फेसबुकच्‍या माध्‍यमातून मैत्री केली. नंतर मोबाईलवर संपर्क साधून त्‍याने तिच्‍यासोबत प्रेमसंबंध प्रस्‍थापित केले. त्‍यांच्‍यात व्‍हॉट्स अॅपच्‍या माध्‍यमातून संवाद होत होता. नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये संदेश पाठवून आरोपीने मी तुझ्यासाठी आत्‍महत्‍या करीत असल्‍याचे सांगून काही छायाचित्रे आणि चित्रफित पाठवली. मुलीने ते खरे मानले. मात्र, आरोपीचा आत्‍महत्‍येचा केवळ बनाव होता. पोलिसांनी मुलीच्‍या आत्‍महत्‍येनंतर तिचा मोबाईल जप्‍त केला होता. त्‍यातील समाजमाध्‍यमांवरील संदेश तपासण्‍यात आले आणि त्‍यातून या घटनेचा उलगडा झाला.