नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी राज्य आणि देशभरातून भीम अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून येतात. अनुयायांच्या गर्दीमुळे रेल्वेतील सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, अशा आशयाची जनहित याचिका ॲड.अविनाश काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. याचिका अप्रसांगिक असल्याचे म्हणत बुधवारी उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.

न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने याचिकेवर निर्णय दिला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दिक्षाभूमीवर लाखोंचा जनसागर ओसळतो. देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी रेल्वेच्या माध्यमातून नागपूरमध्ये डॉ.आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र या गर्दीमुळे रेल्वेतील सामान्य प्रवाशांना त्रास होतो. रेल्वे प्रशासनाने यावर उपाययोजना करायला हवी, या आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने यावर रेल्वे प्रशासनाला उत्तर देण्यासाठी सांगितले होते. रेल्वे प्रशासनाने न्यायालयात उत्तर दाखल केले. यामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी तीन विशेष गाड्या तसेच सुरक्षेसाठी पुरेसे मनुष्यबळ पुरविण्यात आले होते असे सांगितले. रेल्वे प्रशासनाच्या अहवालानंतर याचिका अप्रसांगिक असल्याचे निष्कर्ष न्यायालयाने काढले आणि याचिका निकाली काढली. या प्रकरणात दाखल केलेले तीन मध्यस्थी अर्जही निकाली काढण्यात आले आहेत. याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड.करमकर यांनी बाजू मांडली.

हेही वाचा >>>रुग्णांचा जीव टांगणीला.. पूर्व विदर्भातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर..

तुम्ही यावर्षी प्रवास केला का?

मागील वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या काळात रेल्वे प्रवासात त्रास झाल्याची तक्रार याचिकाकर्त्याने केली होती. यावर न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले की यावर्षी तुम्ही प्रवास केला का? याचिकाकर्त्याने यावर नकार दिल्याने न्यायालयाने याचिका अप्रसांगिक असल्याचे सांगितले. दुसरीकडे मध्यस्थी अर्ज दाखल करणाऱ्या पक्षकारांकडूनही याचिकाकर्त्याचा तीव्र शब्दात विरोध करण्यात आला. याचिका जनहिताची नसल्याचा दावा मध्यस्थी अर्ज करण्याऱ्यांनी न्यायालयात केला.