नागपूर : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावर गृहराज्यमंत्री संजय सावकारे यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षाने सरकारची लाज काढली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेले वक्तव्य आरोपींना पाठिशी घालण्यासाठी आहे. त्यांचा प्रयत्न आरोपी वाचवण्याचा असल्याचे दिसून येते. गृहराज्यमंत्र्यांनी वक्तव्य करताना भान ठेवले पाहिजे. राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सरकार आहे. त्यांचे मंत्री जे वक्तव्य करतात त्याला सरकारचे समर्थन आहे काय, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्री सावकरे म्हणतात, अशा घटना घडत असतात. यांना काही लाज आहे की या लोकांनी ती कमरेला गुंडाळून ठेवली? थोडी तरी लाज बाळगायला हवी. एका तरुणीवर अत्याचार होतो आणि सरकारमधील लोकांच्या वक्तव्याने अख्या महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. गृहमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्याला सहमती आहे काय, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

काय म्हणाले योगेश कदम?

जिथे घटना घडली, तिथे कोणतीही हाणामारी, बळजबरी झालेली नाही. जे काही घडले आहे, ते अतिशय शांततेने घडले आहे. घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजूबाजूला १० ते १५ लोक होते. त्यामुळे ‘ब्लेम गेम’ करण्यापेक्षा या घटनेच्या खोलात पोहचून ज्यावेळी आरोपी आपल्या ताब्यात येईल, तेव्हा माहिती मिळेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली होती. अशातच काँग्रेसचे नेते आणि माजी विरोक्षी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे.

वडेट्टीवार यांचे ट्वीट

पुणे-स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय ? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप का? योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत? बलात्कार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीने विरोध केला नाही, म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहेत. विधान करताना मंत्र्यांनी थोडी लाज शरम बाळगली पाहिजे.

क्लिनचीट देण्याची घाई का?

आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोष देऊन सिद्ध काय करायचे आहे? आरोपीला क्लिनचीट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का आहे? महिलांना सुरक्षित कसे वाटेल? आरोपी सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असल्याचे माहिती होताच मंत्रिमंडळाकडून आता आरोपीची बाजू घेऊन त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे का? असा सवाल उपस्थित करत विजय वडेट्टीवार यांनी योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition criticized government over minister sanjay savkares statement on the pune rape case rbt 74 sud 02