नागपूर : पन्नाशीतील महिलांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही माहिती सोप्या पद्धतीने राज्यातील दोन लाखावर कुटुंबातील महिला व पुरुषांना कळावी म्हणून देशात प्रथमच गीत, निवेदन, चलचित्रातून ऑस्टिओपोरोसिस नियंत्रणाचा अनोखा संदेश तयार केला गेला आहे. त्यासाठी नागपुरातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे.

जागतिक ऑस्टिओपोरोसिस २० ऑक्टोबरला असून त्यानिमित्त बोलताना डॉ. चौधरी पत्रकार परिषदेत म्हणाले, रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या स्त्रियांमध्ये मनगटातील आणि कंबरेच्या हाडांचे फ्रॅक्चर होणे ही सामान्य घटना बनली आहे. मधुमेहाची राजधानी भारताला म्हणत आहेत. परंतु ‘ऑस्टिओपोरोसिस’ या आजाराच्या भयावह रूपाकडे आमचे अजूनही लक्ष नाही. केवळ विदर्भाचा विचार करता पंचेचाळिशी ओलांडलेल्या ४५ टक्के महिलांमध्ये ‘ऑस्टिओपोरोसिस’ आहे. आजही गावखेडे अनारोग्याचे माहेरघर बनत असून २०५० पर्यंत ३०० टक्क्यांनी हाडे ठिसूळ होणारा हा आजार वाढत आहे.

हेही वाचा >>> उत्तर गडचिरोलीवरील ‘हत्ती’संकट अधिक गडद!; शेतीसह मनुष्यहानी रोखण्याचे वनविभागासमोर आव्हान

मात्र, या आजाराच्या धोक्यांकडे ना सरकार गंभीरतेने बघते ना समाज. यामुळेच या आजाराचे विदारक चित्र अभंगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष असे की, ऑस्टिओपोरोसिसवरील जागृती गीत स्वतः डॉ. संजीव चौधरी यांनी लिहिले आहे, तर गीताची संकल्पना डॉ. वैशाली चौधरी यांची आहे. मोरेश्वर निस्ताने यांनी हे गीत गायले. हा संदेश भ्रमणध्वनीवरील व्हाॅट्सॲप, विविध समाज माध्यम आणि इतर यंत्रणेच्या माध्यमातून सुमारे २ लाख नागरिकांपर्यंत पोहचवले जाणार आहे. या अभियानाला यश मिळाल्यास पुढे ते विविध भाषेत तयार करून इतर राज्यांतही उपलब्ध केले जाणार असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> अरबी समुद्रातील चक्रीवादळाचे ‘तेज’ असे नामकरण; कसा असेल दोन्ही चक्रीवादळांचा प्रवास जाणून घ्या…

चलचित्रातील संदेशात काय?

राज्यातील महिलांना कोणत्या वयानंतर हाडांच्या ठिसूळ होण्यापासून काळजी घ्यायची आहे, या शब्दांपासून सुरुवात करीत गीतकार डॉ. चौधरी यांनी या आजारामुळे पाठीचा मणका, छातीच्या फासळ्या, कटी व हाताचे मनगट कसे फ्रॅक्चर होते, याची माहिती देत समतोल आहार, नियमित जीवनशैली, योगा, व्यायाम, ध्यान आणि औषधोपचार इत्यादीद्वारे आपण आपली हाडे मजबूत ठेवू शकतो, असा संदेश या गीतातून मिळतो.