वर्धा : राजकारणात यशस्वी व्हायचे तर गॉडफादर आवश्यक, असे म्हटल्या जाते. सेवाभावी , संघटन सक्षम, संवादी, संभाषण चतुर, सधन, साधनसंपन्न, संपर्कशील, सहजसाध्य, सदैव उपलब्ध एव्हढे पुरेसे नाही. आशीर्वाद देणारा पक्षीय राजकारणात आवश्यक असतो, असे जाणते सांगतात. म्हणून यशाची पायरी चढणारे ही त्यांच्या यशाचे श्रेय आपल्या नेत्याचे नाव घेत देतात. लोकं जाणतात पण तरीही काही हे मान्य करत नाही. काही मात्र दिलखुलासपणे आशीर्वाद कुणाचे हे जाहीर करतात. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांची राजकीय झेप अशीच, डोळ्यात भरणारी.
त्याचे श्रेय कुणास ? तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ते देतात. २०१४ साली ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे बोट पकडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक येऊन ठेपली. वर्धा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपतर्फे दावेदारी केली. तिकीट जवळपास निश्चित झाले पण ऐनवेळी माशी शिंकली. त्यांच्याऐवजी अन्य एकाने तिकीट खेचून नेली. हे कळताच डॉ. भोयर हे दत्ता मेघे घेऊन नितीन गडकरी यांच्याकडे पोहचले. झाले ते योग्य नाही, पंकजलाच तिकीट मिळाली पाहिजे, असा मेघेंचा आग्रह. लगेच गडकरी यांनी एबी फॉर्म घेऊन बुटीबोरीजवळ पोहचलेल्या उमेदवारास फोन लावला. परत बोलावले. तुला अन्य संधी देतो, आता पंकज वर्ध्यातून लढणार, असे गडकरी यांनी स्पष्ट करून टाकले.
इकडे वर्ध्यात भोयर गटावर चिंतेचे सावट पसरले होते. खासदार रामदास तडस भोयर यांना तिकीट नाही म्हणून संताप व्यक्त करीत असतांनाच तिकीट अखेर पक्की झाल्याचा निरोप आला आणि इतिहास घडला. जो चर्चेत राहला.भोयर यांची पुढील वाटचाल ही पक्षातील ढूद्धाचार्यांना चकित करणारी.
सेलू येथील एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बोलतांना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी निखळपणे गडकरी ऋण मान्य करून टाकले. ते म्हणाले की गडकरी यांच्यामुळेच मी आमदार झालो.संकटात त्यांनीच मदत केल्याने आमदार होवू शकलो. त्यांचे आशीर्वाद व लोकांचे बळ मिळाले आणि तीनदा आमदार होवू शकलो, असे ते म्हणाले.
यावेळी माजी खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते व अन्य मान्यवर उपस्थित होते. पुढे डॉ. भोयर यांनी आपल्या भाषणातून सिंदी ड्राय पोर्टबाबत भूमिका मांडली. सेलू बाजारचौकात कृषी खात्याच्या जागेवर शेतकरी बाजारपेठ करण्याचे मत दिले. ५० वर्ष झालेल्या बोर व धाम प्रकल्पची सिंचन क्षमता पूर्णपणे उपयुक्त ठरत नव्हती. आता शासनाने त्या कामासाठी निधी मंजूर केला असल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम होईल, अशी अपेक्षा त्यांनी मांडली.