भंडारा : एसटी बस ही जीवनवाहिनी आहे. शहरी भागासह अनेक ग्रामीण भागातील लोक एसटीवरच अवलंबून असतात. अनेकांसाठी एकमेव साधन असणाऱ्या एसटीची दुरावस्था झाल्याचं चित्र आहे. सध्या प्रवाशांना अशाच बिघडलेल्या एसटीतून प्रवास करावा लागतो आहे. भंडारा डेपोच्या एका बसचे चाक निखळल्याने प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावल्याची अशीच एक घटना समोर आली आहे.

भंडारा जिल्ह्यात एसटी बसची दुरावस्था अनेक घटनांमधून समोर येत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासही सहन करावा लागतो. कुठे बसचे टायर निखळले, तर कुठे बसशी गळती होत असल्याने प्रवाशांना अशाच धोकादायक एसटीमधून प्रवास करावा लागला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

भंडाऱ्याहून नागपूरकडे जाणाऱ्या चालत्या एसटी बसचे चाक निखळल्याने प्रवाशांचा थोडक्यात जीव वाचल्याची घटना घडली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रणात आणली. चालकाच्या सावधगिरीमुळे ४० प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना गुरूवारी सकाळी अंदाजे पावणे सात वाजताच्या सुमारास वडोदा गावाजवळ घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा- नागपूर ही भंडारा डेपोची एसटी महामंडळाची बस क्रमांक एमएच २० जीसी ४११४ सकाळी सहा वाजता नागपूरच्या दिशेने निघाली. या बसमध्ये साधारण ३५ ते ४० प्रवासी होते. बस वडोदा जवळ आल्यावर झूलर फाट्याजवळ अचानक चालत्या बसचे चाक निखळले. बसचे समोरील चाक निखळून शेतात गेले. बस असंतुलित होऊन साधारण पाच ते दहा मीटर घासत गेली. मात्र बसचालकाने प्रसंगवधान राखत सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला बस उभी केली. चालकाच्या सावधगिरीने प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी हा बस अपघाताचा थरार अनुभवला आहे. या घटनेने बसचा प्रवास किती सुरक्षित असा प्रश्न निर्माण झाला आहे. थोडक्यात अनर्थ टळला असला तरी एसटी महामंडळ आणखीन किती दिवस प्रवाशांच्या जीवाशी खेळणार असा प्रश्नही संतप्त प्रवाशांनी उपस्थित केला आहे. एसटी प्रशासनाच्या या गलथान कारभारावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

मागील काही दिवसात भंडारा आगारात अनेक घटना घडत आहेत. भंडारा आणि तुमसर आगारात मानव विकासच्या बसेसमध्ये महिला वाहक नसल्याच्या तक्रारी असताना अद्याप महिला वाहकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही, कालच एका महिला वाहकाने विद्यार्थिनीचे केस खेचण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यानंतर बसचे चाक निघून प्रवाशांचा ही जीव धोक्यात येत आहे.

प्रतिक्रिया..

याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली असून वरिष्ठापर्यंत अहवाल सादर करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. शिवाय कालच्या महिला वाहकाने विद्यार्थिनींचे केस खेचण्याचा प्रकार केला तिच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. -तनुजा अहिरकर, विभाग नियंत्रक, भंडारा गोंदिया विभाग