चंद्रपूर : इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने इंधनाची पाच लाखांची थकीत रक्कम वेळेत दिली नाही म्हणून पेट्रोल पंप मालकाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या वाहनासाठी इंधन देण्यास स्पष्ट नकार दिला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आताही बहुजन कल्याण विभागाकडे इंधनाची एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्यांची दोन लाख ९२ हजार ८६१ रुपयांची रक्कम थकीत असल्याची माहिती आहे.

शासकीय दौऱ्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने वाहन उपलब्ध करून दिले नाही, अशी तक्रार अहीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर विभागीय आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने थकीत रक्कम वेळेत दिली नाही म्हणून पेट्रोल पंप मालकाने अहीर यांच्या शासकीय वाहनाचा इंधन पुरवठा बंद केल्याचे समोर आले आहे.

इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सदस्य आणि सदस्य सचिव यांना कमाल तीन दिवसांसाठी शासकीय दौऱ्यासाठी राजशिष्टाचार, वाहन व निवास देण्याचे आदेशात नमूद आहे. त्यानुसारच अहीर यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी वाहन उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी इंधन पुरवठा खर्च इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडून निधी स्वरूपात वेळोवेळी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, अहीर यांनी तक्रारीत नमूद केलेल्या ४ ते ७ एप्रिल या कालावधीत इंधनाचे ५ लाख ५ हजार ६६४ रुपये थकीत होते. त्यामुळे पेट्रोल पंप मालकाने इंधन पुरवठा बंद केला.

इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडून निधी अप्राप्त

इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडून २५ जुलैला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या इंधन पुरवठ्यापोटी दोन लाख ८३ हजार ९७७ रुपयांचा निधी प्राप्त झाला. एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्यांचा दोन लाख ९२ हजार ८६१ रुपयांचा निधी अद्याही थकीत आहे. इंधनाची रक्कम थकीत असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाने विनंती करून अहीर यांच्या शासकीय वाहनाचा इंधन पुरवठा सुरळीत सुरू ठेवला होता. मात्र, थकबाकी वाढल्याने पेट्रोल पंप मालकाने हे पाऊल उचलले, अशी अशी माहिती समोर आली आहे.

‘नियमानुसारच काम’

याप्रकरणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना विचारणा केली असता, नियमानुसारच काम केल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.