नागपूर : कोळसा घोटाळा प्रकरणातले नागपूरचे उद्योजक आणि कॉर्पोरेट पॉवर लिमिटेडचे प्रोमोटर मनोज जयस्वालला अटक करण्यासाठी आलेल्या कोलकाता येथील केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय) पथकाला जयस्वाल आणि त्याच्या समर्थकांनी धक्काबुक्की करीत धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर सीबीआयने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर सिताबर्डी पोलिसांनी जयस्वालसह दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात गुन्हे दाखल केले.

१८० कोटी ७० लाख रुपयांचा कोळसा घोटाळा आणि बँक फसवणूक प्रकरणात २०२२ मध्ये सीबीआयने जयस्वाल विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच प्रककरणात अटक वॉरंट घेऊन १६ सप्टेंबरला सीबीआयचे कोलकाता पथक नागपुरात दाखल झाले. सौरभ कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चार दिवस जयस्वालचा ठावठिकाणा शोधला. दरम्यान तो हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये लपल्याचा सुगावा पथकाला लागला. त्या आधारे पथकाने शुक्रवारी १९ सप्टेंबरला हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये झडती घेतली.

जयस्वाल हा खोली क्रमांक ५०१ मध्ये थांबल्याचा सुगावा पथकाला आधीच लागला होता. जयस्वाल थांबलेली खोली तपन सेन आणि नासेर खान पठाणच्या नावाने बुक होती. झडतीदरम्यान सीबीआयच्या पथकाला खोलीत महिला आढळली. तिने आपली ओळख आधी कुसुम अग्रवाल सांगितली. मात्र नंतर ती मनोज जयस्वालची पत्नी असल्याची खात्री पथकाला पटली. दरम्यान जयस्वाल हा खोलीतल्या स्वच्छतागृहात लपला. त्याच वेळी जयस्वालचे साथीदार दिलीप कुमार सुखदेव साहू आणि त्रिलोकसिंग जगतसिंग या दोघांनी पथकाला धक्काबुक्की केली. पथकाने हॉटेल स्टाफच्या मदतीने जयस्वालला स्वच्छतागृहातून बाहेर काढत तडक कोलकाता कडे प्रयाण केले. सिताबर्डी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वंजारी पुढील तपास करत आहेत.

या घडामोडीत कोलकाता येथे सखोल चौकशी केल्यानंतर सीबीआयचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सौरभ कुमार सिंह हे रविवारी २८ सप्टेंबरला नागपूरात दाखल झाले आणि थेट सिताबर्डी पोलिस ठाण्यात पोचले. जयस्वालसह धक्काबुक्की करणारा दिलीप कुमार आणि त्रिलोक सिंग या दोघांविरोधात सरकारी काम आणि कर्तव्यात अडथळा आणल्याची रितसर तक्रार त्यांनी दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. दिड आठवड्यांपूर्वी सीबीआयच्या कोलकाता पथकाने केलेल्या या कारवाईत अतिशय गोपनियता बाळगली गेली होती. प्रकरणाचा कुठलाही तपशील पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांनाही दिला नव्हता.

यापूर्वीही दाखल होते गुन्हे

जयस्वाल प्रमोटर असलेली कॉर्पोरेट पॉवर लिमिटेडचे मुख्यालय कोलकातातल्या सॉल्ट लेक येथे आहे. संबंधित कंपनीने विविध बँकांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे ४ हजार ३७ कोटींचे कर्ज उचलले. यासंदर्भात युनियन बँक ऑफ इंडियाचे तत्कालिन उपमहाव्यवस्थापक टी.दीना दयाल यांच्या तक्रारीवरून २० डिसेंबर २०२२ ला जयस्वालसह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. सक्त वसुली संचालनालयानेही नंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात जयस्वालवर ही कारवाई झाली. मात्र पथकाने गोपनियता बाळगत याबाबत कोणताही तपशील दिला नाही. कोळसा खाण ब्लॉक वाटप प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने यापूर्वी त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.