नागपूर : पोलिसांनी संघटित गुन्हेगारांवर जोरदार प्रहार केला असून सहा महिन्यांत ५० वर गुन्हेगारांना तडीपार केले आणि जवळपास तितक्याच गुन्हेगारांना स्थानबद्ध करीत कारागृहांमध्ये डांबले. धक्कादायक म्हणजे, यातील निम्मे गुन्हेगार हे गिट्टीखदान, जरीपटका परिसरातील आहेत.
परिमंडळ २ व ५ मध्ये उत्तर नागपुरातील सदर, मानकापूर, गिट्टीखदान, सीताबर्डी, धंतोली, अंबाझरी आणि जरीपटका, यशोधरानगर, कोराडी, कपिलनगर, न्यू कामठी, जुना कामठी, कळमना आणि पारडी असे १४ आणि सायबर पोलीस शाखा अशा १५ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. यातल्या बहुतांश पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील लोकवस्ती घनदाट आहे. तडीपार केलेल्यांमधील निम्मे सराईत गुन्हेगार हे याच वस्त्यांमधील आहेत. शहरातील एकूण ३४ पोलीस ठाण्यांपैकी निम्मे पोलीस ठाणे याच हद्दीत आहेत.
दोन वर्षांत १५ टोळ्या स्थानबद्ध
पोलीस आयुक्तालयाच्या शहर हद्दीत ३४ पोलीस ठाणे आहेत. यापैकी परिमंडळ २, ३, ४ आणि ५ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ८० टक्के पोलीस ठाणे दाट लोकवस्तीमुळे अतिसंवेदनशील आहेत. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या एकूण तडीपार आणि स्थानबद्ध कारवायांपैकी ८० ते ९० टक्के सराईत गुन्हेगार हे याच परिमंडळातील आहेत. या परिमंडळांमधील १५ संघटित गुन्हेगारांच्या टोळ्यांवर गेल्या दोन वर्षांमध्ये पोलिसांनी कारवाई केली. याशिवाय ११० सराईत गुन्हेगारांना तुरुंगात डांबले. त्यापैकी संतोष आंबेकर, रणजित सफेलकर, राजा गौस, हर्ष पिंडा आनंदपवार, योगेश बांते, राजू भद्रे, समशेर खान सारखे सराईत सध्या खडी फोडत आहेत.
कारवायांची | आकडेवारी |
२०२० | ४८ |
२०२१ | १०१ |
२०२२ | ९८ |
२०२३ | ३९ |
२०२४ | ७९ |
२०२५ (सहा महिने) | ५१ |
हद्दपारीच्या कारवाया
वर्ष | परिमंडळ १ | परिमंडळ १ | परिमंडळ १ | परिमंडळ १ | परिमंडळ १ | एकूण |
२०२० | २ | ०८ | १६ | ०३ | १९ | ४८ |
२०२१ | १२ | १८ | १८ | ३० | २३ | १०१ |
२०२२ | १६ | १८ | १२ | २९ | २३ | ९८ |
२०२३ | ०६ | ११ | ०५ | ०९ | ०८ | ३९ |
२०२४ | ०७ | २० | ११ | १३ | २८ | ७९ |
२०२५ | ५ | १७ | ०७ | ०७ | १८ | ५४ |
सराईत गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस अधिकारी आणि परिमंडळ उपायुक्तांना देण्यात आल्या आहेत. प्राणघातक हल्ले करणाऱ्यांवर एमडीडीए अंतर्गत कारवाईला प्राधान्य दिले जाते. डिजिटल माध्यमांचा आधार घेऊन टोळ्यांवर नजर ठेवली जात आहे. नवीनचंद्र रेड्डी, सह पोलीस आयुक्त.