बुलढाणा : नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यावर दुसऱ्याच दिवशी आज गुरुवारी नाट्यमय आणि धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी गत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या कडून ‘आलेली’ १ कोटी रुपयांची रक्कम घेत युतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले. एक कोटीपैकी दहा ते पंधरा टक्के रक्कम काही जवळच्या (भाजप) पदाधिकाऱ्यामध्ये वाटण्यात आली. त्यात मी सुद्धा एक लाखाचे वाटेकरी असल्याचा धक्कादायक आरोप अनंता शिंदे करून धमाल उडवून दिली. नगर पालिका निवडणुका जाहीर झाल्या असताना हे आरोप करण्यात आले. यामुळे महायुतीसह शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

भाजप बुलढाणा शहर सचिव, अध्यक्ष आणि अलीकडेच जिल्हा सचिव म्हणून कार्यरत अनंता शिंदे यांची जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी ओळख आहे. मात्र, त्यांनी आज शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात पत्र परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभेत जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या कडून आलेली १ कोटी रुपयांची बॅग स्वीकारली असा आरोप केला. त्यांनी लोकसभा निवडणुकीत देखील तडजोड केली. तसेच विधानसभा निवडणुकात युतीचे उमेदवार संजय गायकवाड आणो लोकसभेत प्रतापराव जाधव यांच्या विरोधात काम केले असा आरोप केला.

तक्रार केल्यावर प्रमोशन!

दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नवे प्रवेशित अनंता शिंदे यांच्या आरोपांचे समर्थन केले. ते म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत भाजपा बुलढाणा लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे व काही पदाधिकाऱ्यांनी आघाडी कडून ५ कोटी घेऊन आपल्या विरोधात काम केले. अशी लेखी तक्रार आपण प्रदेश भाजप ते दिल्लीतील भाजप नेत्यांकडे केली होती. त्यावर काही कारवाई करण्याऐवजी शिंदेना भाजप जिल्हाध्यक्ष करून प्रमोशन देण्यात आले.

शिंदे म्हणतात…

दरम्यान या आरोपावर प्रतिक्रिया विचारली असता भाजपा जिल्हाध्यक्ष शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच गायकवाड यांनी माझ्यावर निवडणुकीत ५ कोटी रूपये घेतले, त्यातून डिफेन्डर गाडी घेतली असा आरोप केला होता. आता मीच मोठा केलेल्या आणि ‘ सर्वगुण संपन्न ‘असूनही ज्याला सांभाळले अश्या अनंता शिंदे याने १ कोटीचा आरोप केलाय. त्यामुळे चार कोटी गेले कुठे? असा मिस्किल प्रश्न उपस्थित करून त्या दोघांनी नेमका किती कोटींचा आरोप करायचा हे नक्की ठरवावे अश्या शब्दात शिंदेनी आरोप व आरोपकर्त्यांची खिल्ली उडविली. मी लोकसभेची उमेदवारी मागे घ्यावी म्हणून प्रतापराव जाधव माझ्या निवासस्थानी तीन तास बसून होते, आम्ही युती धर्म पाळला हे त्यांना ठाऊक आहे. यात ‘डील’ चा प्रश्न आला कुठे? असा प्रती प्रश्न शिंदेनी उपस्थित केला.

जयश्री शेळके म्हणतात…

दरम्यान विचारणा केली असता ठाकरे सेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि विधानसभेच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी हा युतीच्या दोन पक्षातील प्रश्न आहे, मी त्यात काय बोलणार? गायकवाड असो वा अनंता शिंदे यांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही. आता विधानसभेत आपण १ लाख मतांच्या फरकाने निवडून येऊ अशा जाहीर वल्गना करणारे गायकवाड १ हजाराच्या फरकाने देखील निवडून आले नाही. त्यातच विधानसभा व लोकसभा लढतीत बुलढाणा शहरात आघाडीला मताधिक्य मिळाले. यामुळे बुलढाणा पालिका निवडणुकीतील संभाव्य पराभव लक्षात घेऊन हे आरोप केले असावे अशी प्रतिक्रिया शेळके यांनी दिली.