अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान करून मोठी खळबळ उडवून दिली आहे.शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी थेट आमदारांना ‘कापून टाकण्याची’ भाषा केली आहे. तसेच हा कार्यक्रम सुरू केला, तर सरकार गुडघ्यावर येईल. पण मरण्यापेक्षा लढणे सुरू करा, असेही बच्चू कडू म्हणाले.
सध्या बच्चू कडू हे राज्यभर दौरा करीत आहेत. शेतकरी हक्क परिषदेत बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत असताना गप्प आहेत. जाती-पातीच्या राजकारणात शेतकरी अडकून पडले आहेत. ते अन्यायाच्या विरोधात पेटून उठत नाहीत. तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, त्याला लाथ तरी मारता येते. आपण जर शेतकऱ्याला विचारले तर तू काय करतो, तर त्याला काहीच येत नाही.
अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. हा कार्यक्रम जर सुरू केला, तर सरकार गुडघ्यावर येईल. पण हा कार्यक्रम कोणाला द्यायचा. मारण्यापेक्षा लढणे सुरू करा. आमच्या मालाला भाव मिळाला तर आम्ही लोकांना नोकरीला ठेवू. आरक्षणामुळे एखादी परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो, मात्र मालाला भाव मिळाला तर अख्खे गाव सुखी होऊ शकेल, असेही बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले, लोकसभेची निवडणूक असताना तुम्ही कापसाला, सोयाबीनला भाव मागितला का? तुम्ही जात पाहिली. पण सर्व जाती याच मातीमुळे जगतात हे विसरू नका. शेतकरी हे सगळ्या जातीत सापडतात. सर्वात जास्त मेहनत आमची आणि आपल्याला हे लुटतात. सरकार हे डुकरासारखे आहे, डुक्कर परवडले पण सरकार नाही. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असते हप्ते वसूल केले की झाले, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
मला निवडणुकीत शेतकऱ्यांनीच पाडले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीने लढाई केली. शरद जोशी अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले. या सरकारने शेतकऱ्यांना भगवा हिरवा निळा रंगात वाटले आणि त्यामुळे शेतकरी वाटल्या गेला. शरद जोशींना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि मलाही शेतकऱ्यांनीच पडले. कारण मी जातीत बसलो नाही. तुम्ही असेच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही. असेही बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी सरकारविरोधात संघर्षासाठी येत्या २८ ऑक्टोबरला नागपूर येथे एकत्र येण्याचे आवाहन केले.