नागपूर :खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांप्रमाणे खासगी रेडिओ एफएम वाहिन्याही मोठ्या महानगरात लोकप्रिय झाल्या आहेत. या वाहन्यांवरील अनेक कार्यक्रम लोकप्रिय ठरले आहेत. त्याची चर्चाही सर्वदूर होत आहे. या वाहन्यांमध्ये सेवा देणारे आरजे आणि त्यांची कार्यक्रम सादरीकरणाची शैली लोकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या सेवा छोट्या शहरातही सुरू होत आहे. 

केद्रीय मंत्रिमंडळाने खासगी एफ. एम. रेडिओ विषयीच्या तिसऱ्या टप्प्यातील धोरणाअंतर्गत २३४ नवीन शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. त्यात महाराष्ट्रातील अकरा शहरांचा समावेश आहे. त्यात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ वर्धा या शहरांसह बार्शी,  लातूर, मालेगाव, नंदूरबार उस्मानाबाद,उदगीर या ११ शहरांचा समावेश आहे. नव्याने सुरु होणाऱ्या खाजगी एफ. एम. रेडिओ वाहिन्यांमुळे छोट्या शहरांची मागणी पूर्ण होणार आहे. यासोबतच यामुळे त्या त्या प्रदेशातील मातृभाषेमधून नव्या धाटणीची, स्थानिक पातळीवरील आशय निर्मिती देखील होऊ शकणार आहे.

हेही वाचा >>> भंडारा : अपत्य प्राप्तीचा दावा करणे ज्योतिषांना भोवले!

या नव्या खाजगी एफ. एम. वाहिन्या सुरू झाल्याने रोजगाराच्या नव्या संधी देखी निर्माण होतील, त्यासोबतच स्थानिक बोली भाषा आणि संस्कृतीला तसेच ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमालाही चालना मिळू शकणार आहे.बरीचशी शहरे  ही  आकांक्षीत जिल्ह्यांमधील आहेत. अशा भागांमध्ये या नव्या खाजगी एफ.एम. वाहिन्या सुरू झाल्याने, त्या त्या प्रदेशातील सरकारच्या संपर्काच्या व्याप्तीचा अधिक विस्तार आणि सक्षमीकरण होण्यालाही मदत मिळणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या  बैठकीत ७८४.३७ कोटी रुपयांच्या राखीव मुल्यांसह २३४ शहरातील ७३० वाहिन्यांकरिता ई-लिलावाची तिसरी फेरी आयोजित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> संघाशी संबंधित संघटनेच्या आंदोलनाकडे सरकारची पाठ.. नागपुरात उपोषण…

खासगी एफएम वाहिन्यांसाठी वारषिक परवाना शुल्कापोटी वस्तू आणि सेवा कर वगळून  एकूण चार टक्के शुल्क म्हणून आकारले जाणार आहे. या उपक्रमाचा फायदा स्थानिक कलावंताना होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे रोजगार निर्मितीलाही हातभार लागणार आहे. अलीकडच्या काळात मोबाईल फोनमध्येही एफएमची सुविधा असते. ग्रामीण भागात नागरिकांना या सेवेचा फायदा होऊ शकतो. सांस्कृतिक कार्यक्रम, गावातील गप्पा व तत्सम कार्यक्रम तसेच प्रबोधनात्म व शैक्षणिक कार्यक्रमांची  रेलचेल या माध्यमातून श्रोत्यांना अनुभवायला मिळू शकते. मोठ्या महानगरात सध्या खासगी एफएम सेवा सुरू असून त्यांना श्रोत्यांची पसंतीही मिळत आहे. ग्रामीण भाग किंवा छोट्या शहरात ही सेवा सुरू झाल्यावर लोकांची  सोय होऊ शकते.