अकोला : आगामी त्रिपुरा पौर्णिमेला आकाशात महा ‘सुपरमून’ अनुभवण्याची मोठी पर्वणी लाभणार आहे. विशेष आकर्षण असलेला आकाशातील चंद्र नेहमीपेक्षा ३० टक्के अधिक प्रकाशित दिसेल. या संधीचा खगोल प्रेमींनी आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

आकाशातील चंद्राचे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच विशेष आकर्षण असते. त्याच्या रोज बदलणाऱ्या कला आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. पौर्णिमेचा चंद्र तर अधिकच हवाहवासा असतो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत या दोघांमधील अंतर कमी अधिक होत असते. येत्या ५ नोव्हेंबरला, बुधवारी हे अंतर गेल्या नऊ वर्षांनंतर सर्वात कमी होत असल्याने चंद्र नेहमी पेक्षा अधिक मोठा दिसेल. यालाच ‘सुपरमून’ म्हणून ओळखतात. आकाश प्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. या पौर्णिमेचा चंद्र १४ टक्के आकाराने मोठा आणि ३० टक्के अधिक प्रकाशित असेल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

पृथ्वी व चंद्रातील अंतर २५ हजार कि.मी.ने कमी होणार

पृथ्वी व चंद्र यांच्यामधील सरासरी अंतर तीन लाख ८४ हजार कि.मी. असून यावेळी हे अंतर सुमारे २५ हजार कि.मी.ने कमी राहील. विशेष म्हणजे ही वेळ संध्याकाळी ६.४९ वाजता असल्याने या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद अधिक मोठा असेल. यानंतर अशी संधी १० फेब्रुवारी २०२८ या दिवशी येईल, अशी माहिती दोड यांनी दिली. जेव्हा पौर्णिमा किंवा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो, तेव्हा त्याला सुपरमून म्हणतात. या स्थितीमुळे चंद्र नेहमीपेक्षा तेजस्वी दिसतो. चंद्राची कक्षा पूर्णपणे गोल नसून लंबवर्तुळाकार असल्यामुळे, तो पृथ्वीच्या कधीतरी जवळ असतो, ज्याला ‘पेरीजी’ म्हणतात. पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे सुपरमून सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठा आणि अधिक तेजस्वी दिसतो.

सुपरमून ही एक नैसर्गिक आणि नियमित खगोलशास्त्रीय घटना आहे. चंद्राच्या कक्षेत बदल झाल्यामुळे सुपरमून अधूनमधून घडतात. सुपरमून पौर्णिमेच्या चंद्रामुळेच नाही, तर इतर वेळी देखील होऊ शकतो, पण तो आपोआप दिसू शकत नाही, कारण तो सूर्याच्या दिशेने असतो. दरवर्षी सलग महिन्यांत सुपरमून दिसतात आणि कक्षाच्या वेळेनुसार, ३ किंवा ४ सुपरमून घटना घडतात. पेरिगी-सिझीजीच्या कठोर खगोलशास्त्रीय व्याख्येनुसार, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी अंदाजे दर १४ महिन्यांनी एकदा पूर्णपणे संरेखित होतात, अशी माहिती देखील प्रभाकर दोड यांनी दिली.