अकोला : मध्यरात्री १२ वाजताची वेळ, सर्वत्र शांतता असतांना अचानक गायगाव येथील एका पेट्रोलपंपावर एक मोठा अजगर अवतरतो. त्याला बघून कर्मचाऱ्यांची भंबेरी उडते. कर्मचाऱ्यांनी सतर्कता राखून ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांना पाचारण केले. त्यांनी काही मिनिटांमध्ये पेट्रोल पंप गाठून अजगराला शिताफीने पकडले. परिसरातील नागरिकांना भयमुक्त करून त्या अजगाराला जीवदान देण्यात आले.

सध्या पावसाच्या दिवसांमध्ये साप दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे पाणी बिळात जात असल्याने साप बाहेर येतात. काही पावसाच्या पाण्यासोबत वाहत येतात. असाच एक आठ फूट लांब अजगर गायगाव येथील मंदिराजवळील पेट्रोलपंपावर रात्री १२ वाजताच्या सुमारास आला. अजगराला पाहून कर्मचारी घाबरले. त्यांनी तात्काळ ज्येष्ठ सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना माहिती दिली. अजगर इकडे-तिकडे जाऊ नये म्हणून बाळ काळणे यांनी अजगरावर मोठे कापड घालण्याची सूचना कर्मचाऱ्यांना केली.

अजगर मंदिराकडे गेला असता तर दिसला नसता. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला असता. कापड नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी एक मोठी टोपली अजगरावर टाकून ठेवली. बाळ काळणे व त्यांचे सहकारी तुषार आवारे हे रात्री पेट्रोलपंपावर दाखल झाले. त्यांनी मोठ्या शिताफीने अजगराला पकडून पोत्यात टाकले. पावसाळ्यातील पूर परिस्थितीत अजगर हे वाहत ग्रामीण भागात येऊ शकतात. गावातील श्याम वडतकर, रवी इंगळे, विशाल ठाकरे, ओम आगरकर, गोपाल गिर्हे आदी गावकऱ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अजगराला वाचवण्यासाठी मदत केली.

अजगर हा बिनविषारी आहे. मात्र, शक्तिशाली व दातांची संख्या जास्त असल्यामुळे तो मानवी चुकामुळे धोकादायक ठरू शकतो. मात्र, स्वतःहून अजगर मानवावर हल्ला करीत नाही. अजगराचे मुख्य खाद्य हे रानडुककर, हरिण, माकडे, घुशी, उंदिर हे आहेत, असे सर्पमित्र बाळ काळणे यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड, गजानन इंगळे यांच्या सुचनेनुसार बाळ काळणे, तुषार आवारे, चालक आलासिंग राठोड यांनी अजगराला जंगलात सुरक्षित सोडून दिले.

६५ च्यावर अजगरांना जीवदान

ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांनी आतापर्यंत ६५ च्यावर अजगरांना जीवदान दिले आहे. अनेक दुर्मीळ अजगरांना त्यांनी स्वतः पकडले आहे. अजगराच्या बेवारस अंड्यातून पिल्ले सुरक्षित बाहेर काढले. अनेक जखमी अजगरांवर उपचार करण्यास मदत केली. कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमुळे बाळ काळणे यांना ७९ टक्के दिव्यांगत्व आले. तरीही त्यांनी निसर्गसेवेप्रति समर्पणाची भावना कायम ठेवली.