यवतमाळ : गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने सतत दुर्लक्ष केल्याने देशातील सर्वसामान्य जनता पिचली जात आहे. शेतकऱ्यांचे शोषण व आत्महत्या, महागाई, बेरोजगारी आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार या ज्वलंत मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कदी बोलणार, असा प्रश्न शेतकरी नेते आणि शिवसेना (उबाठा)चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्याच्या अनुषंगाने उपस्थित केला आहे. ते आज. सोमवारी येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर: आशा स्वयंसेविकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यापुढे ठिय्या आंदोलन, मागणी पूर्ण होईस्तोवर…

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जिल्ह्यातील दाभडी या गावी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम गाजावाजा करून घेण्यात आला. या ठीकाणी दिलेली सर्व आश्वासने आता १० वर्षानंतर खोटी ठरली असल्याचे आणि भाजपा सरकार हवालदिल शेतकरी, बेरोजगार आणि सामान्य माणसाची सतत फसवणूक करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. या संबंधात एक पत्र नरेंद्र मोदींना पाठवले असून त्यात अनेक गंभीर वास्तविक विषयावर प्रकाश टाकला आहे, असे तिवारी म्हणाले. केंद्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पट करू, दोन कोटी रोजगार देवू, महागाई वर लगाम आणू, पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी करू, शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या थांबतील आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट करू, अशी प्रमुख आश्वासने भाजपाने दिली होती. १० वर्षात यातील एक ही शब्द नरेंद्र मोदी सरकारने पाळला नाही. शेतीवरचा खर्च दुप्पट झाला तरी आज सरकार हमी भाव सुद्धा द्यायला तयार नाही. कापूस, सोयाबीनचे भाव पडले असतानाही केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी सीसीआय आणि नाफेड माल खरेदी करण्यास तयार नाहीत. तुटपुंजे केंद्र उघडुन शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे, असे तिवारी म्हणाले.

हेही वाचा >>> Gold Rate in Nagpur : दोनच तासात सोन्याच्या दरात उसळी; ‘हे’ आहेत आजचे दर…

शिक्षण, आरोग्य यांचे वरील खर्च तिप्पट झाला आहे. महागाईने जनता हैराण आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव आकाशाला भिडले आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या गंभीर विषयावर आपले तोंड कधी उघडणार? असा प्रश्न तिवारी यांनी विचारला आहे. रेटून खोटे बोलणे हे फक्त एकमेव तंत्र मोदींना चांगले अवगत असून ज्वलंत मुद्यांवर बोलण्यास त्यांना अजिबात आवडत नसल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे वॉर रुम सदस्य राहिलेल्या किशोर तिवारी यांनी केला आहे. तर २०१९ मध्ये पांढरकवडा येथे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महिला बचत गटांचे कर्ज माफ करून ३ लाखाचे व्याजमुक्त कर्ज देणे व सर्व आदिम आदिवासी बंजारा, भटक्या समाजाला पक्के घर देण्याचे,सर्वाना पिण्याचे शुद्ध पाणी नळाने घरी देऊ,प्रत्येक घरात एकाला रोजगार देऊ अशा घोषणा केल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारचे धोरण हे फक्त मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना लाखो कोटी रुपयांचा फायदा पोहचविणे हाच आहे, अशी टीका किशोर तिवारी यांनी केली. उत्तर भारतात शेतकऱ्यांचे खूप मोठे जनआंदोलन सुरू असून त्यांच्या मागण्या एकूण घेण्याचे सौजन्यसुद्धा नरेंद्र मोदींना असू नये. दिल्लीला पोहचू न देता शेतकऱ्यांवर अश्रू धुराच्या नळकांड्या फोडून, लाठी चार्ज करून बेदम मारले जात आहे. जनआंदोलन करण्यासाठी त्यांना सुप्रीम कोर्टात जावे लागत आहे, या पेक्षा मोठी शोकांतिका नसल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. येत्या लोकसभा निवडणूकीत चारशे पारचा अहंकार जनता  साफ करेल, असेही तिवारी म्हणाले. पत्रकार परीषदेला शेतकरी वारकरी संघटनेचे सिकंदर शहा आदी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Questions rise by shiv sena leader kishore on narendra modi before visit to yavatmal nrp 78 zws
Show comments