बुलढाणा : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट भिरकावल्याची घटना नुकतीच घडली. यावरून राज्यासह देशात वादंग उठले. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी आंदोलने करून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सामाजिक व राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या बुलढाणा  जिल्ह्यातही याचे पडसाद उमटले. अजूनही आंदोलने करून घटनेचा निषेध करून संबंधित वकिलाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष व  सामाजिक क्षेत्रातही कार्यरत राधेश्याम चांडक यांनी या संपूर्ण  घटनाक्रमावर भूमिका मांडली आहे. भर न्यायालयात बूट भिरकावण्यात आल्यावरही सरन्यायाधीश गवई यांनी अत्यंत शांतचित्ताने आणि संयम राखत त्या वकिलाला क्षमा केली. एवढेच नव्हे तर त्या वकिलावर  ‘कुठलीही कारवाई करू नका’ अशी सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी व संबंधिताना केली. या कृतीतून गवई यांनी भगवान गौतम बुद्धांच्या अहिंसा आणि क्षमातत्त्वाचे जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवले. परंतु, ज्यांनी क्षमा दिली, त्यांच्याच नावाने राजकारण का?, असा सवाल राधेश्याम चांडक यांनी उपस्थित केला आहे. आंदोलनकर्त्यांनी न्या. गवई यांचा शांततेचा संदेश समाजात पोहचवावा, असे आवाहनही चांडक यांनी केले आहे.

चांडक म्हणाले की, देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत असलेल्या सरन्यायाधीशांवर स्वत:वर अन्याय झाला तरी क्षमा करण्याची भूमिका घेतली. त्यांच्या नावाने राजकारण करणे हे बुद्धांच्या शिकवणीच्या विरोधात आहे. गवई यांनी ज्या शांततेचा आणि करुणेचा संदेश दिला, तोच आपल्याला आत्मसात करायला हवा. गवई यांनी दाखविलेली क्षमा केवळ एका व्यक्तीबद्दल नव्हती, तर ती संपूर्ण समाजासाठी ‘शांती आणि सहिष्णुतेचा संदेश’ होती. अहिंसेच्या या मार्गानेच देशातील वैचारिक संघर्ष मिटू शकतात. हा संदेश आज प्रत्येक नागरिकाने मनात कोरून ठेवावा, अशी  भूमिका राधेश्याम चांडक यांनी मांडली आहे.

‘क्षमा वीरस्य भूषणम’

चांडक यांनी सांगितले की, गौतम बुद्धांनी ‘क्षमा ही मोठेपणाची ओळख आहे’ हे तत्त्व शिकवले. जैन धर्मातही ‘क्षमा वीरस्य भूषणम’ हे तत्त्व सांगितले आहे. सरन्यायाधीशांनी त्या तत्त्वांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करून समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आणि समाजाने कारवाईची मागणी करण्याऐवजी गवई यांच्या वर्तनातून प्रेरणा घेऊन शांततेचा, संवादाचा आणि सहिष्णुतेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन चांडक यांनी केले आहे.