नागपूर : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. संघाचा शताब्दी सोहळा हा नागपूरमधील रेशीमबाग परिसरात २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच कोविंद यांचे नागपूरमध्ये आगमन झाले. संघाच्या मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यापूर्वी कोविंद यांनी दीक्षाभूमीमध्ये भेट दिली.

उल्लेखनीय आहे की नागपूरमध्ये विजयादशमीच्या दिवशी संघाच्या कार्यक्रमासोबतच धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जातो. यात लाखोे अनुयायी सहभागी होतात. त्यामुळे रामनाथ कोविंद यांची भेट महत्वाची ठरते. दीक्षाभूमीवर गेल्यावर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीबाबत महत्वपूर्ण विधानही केले.

काय म्हणाले कोविंद?

दीक्षाभूमीवर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मध्यवर्ती स्तुपाला भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. लाखो अनुयायांसोबत पवित्र दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी धम्मक्रांती केलेल्या दीक्षाभूमीवर भेट देणे सौभाग्याचे आहे. या ऐतिहासिक स्थळावरून समानता, दयाळूपणा आणि न्यायाची प्रेरणा मिळते असा संदेश कोविंद यांनी दिला. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई देखील उपस्थित होते. त्यांनी रामनाथ कोविंद यांचे स्वागत केले आणि त्यांना स्मृतीचिन्ह भेट केले.

हेडगेवार निवासालाही भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी सकाळी ७.४० वाजता कार्यक्रम असल्याने कोविंद यांचे बुधवारी नागपूरमध्ये आगमन झाले असून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाच्या कार्याबद्दलची माहितीदेखील जाणून घेतली.

संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिल्यावर कोविंद यांनी त्यांच्या भावना अभ्यांगत वहीत व्यक्त केल्या. यावेळी संघाचे काही पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाल परिसरात असणाऱ्या हेडगेवार यांच्या निवासस्थानाचे महत्त्व सांगितले. कोविंद गुरुवारी स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. संघाच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार कोविंद पहिलेच माजी राष्ट्रपती असल्याने ते संघ स्वयंसेवकांशी नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळासह देशाचे लक्ष लागले आहे. कोविंद यांनी हेडगेवारांच्या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेत त्यांनी येथे असलेल्या झोपाळ्यावरही बसण्याचा आनंद घेतला.