नागपूर : “रामचरीत मानस” ला राष्ट्रीय पुस्तकाचा दर्जा मिळायला हवा, तर “भगवद्गीता” पाठ्यक्रमात असायला हवी. हे झाले, तरच हा समाज सुधारेल, समाज वाचेल, असे प्रतिपादन डॉ. गीता सिंग यांनी केले.साहित्य भारतीच्यावतीने ‘महात्मा तुलसीदास : व्यक्तित्त्व व कृतित्त्व’ या विषयावर राजकुमार केवलरामानी कन्या महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या प्राध्यापक डॉ. गीता सिंग यांचे तर ‘मुन्शी प्रेमचंद की प्रासंगिकता’ या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. मनोज पांडेय यांचे व्याख्यान दक्षिण अंबाझरी मार्गावरील बीआरए मुंडले हायस्कूलच्या नवदृष्टी सभागृहात आयोजित करण्यात आले.
उत्तरप्रदेश हे राज्य धर्माच्या बाबतीत अतिशय सुरक्षित आहे. राममंदिर तुटले तेव्हा आम्ही किती रडलो, पण त्याहीपेक्षा ज्या काळात हे घडले, ते किती रडले असतील. आज पुन्हा त्याच ठिकाणी राम मंदिर उभे झाले आहे आणि आम्ही पुन्हा राम दर्शनासाठी त्याठिकाणी जाऊ शकतो. हे साध्य झाले, ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे. समाज, धर्म वाचवायचा असेल तर “रामचरीत मानस” आजच्या पिढीसमोर ठेवायला हवे. तरच मुलांवर संस्कार होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर मी एक विनंती केली आहे. “रामायण” आणि “गीता” साठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त दहा-दहा गुण द्यायला हवे, जेणेकरून मुले हे अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी “रामायण” “गीता” वाचतील.
तुलसीदास यांचे अंतरिक्ष खूप मोठे आहे, पण त्यांची उपेक्षाच अधिक झाली. त्यांची पुस्तके अनेकांना कळत नव्हती आणि म्हणूनच कदाचित त्यांचे समीक्षकही कमी होते, असे प्रतिपादन राजकुमार केवलरामानी कन्या महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या प्राध्यापक डॉ. गीता सिंग यांनी केले. मी रामाची आहे, रामामुळेच इथे आहे, पण म्हणून राम आपले पोट का भरतील? त्यासाठी आपल्याला कष्ट करावेच लागतील.
तुलसीदास यांनी त्यांच्या आयुष्यात खूप सहन केले. तुलसीदास वाचने म्हणजे मागे जाणे असे समजतात, पण ते चूक आहे. तुलसीदासांची एक ओळ म्हणजे एका मंत्राच्या बरोबर आहे. साहित्य क्षेत्रात ही लढाई लढावी लागेल, असे डॉ. गीता सिंग म्हणाल्या. मुन्शी प्रेमचंद हे त्याकाळातील विश्वाचे रचनाकार होते, असे प्रतिपादन डॉ. मनोज पांडेय यांनी केले. प्रेमचंद ते पहिले रचनाकार होते, ज्यांनी भारतीय समाजाची दशा दाखवण्याचा पहिला प्रयत्न केला. यावेळी कार्यक्रमाला हिंदी साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.