नागपूर : पती बाहेरगावी गेल्याची संधी साधून पत्नीने प्रियकराच्या घरी जाऊन मुक्काम केला. मात्र, पती माघारी परतल्यानंतर पत्नी घरात आढळून आली नाही. त्यामुळे तो शेजारी राहणाऱ्या युवकाच्या घरात गेला. त्यावेळी युवक आणि पत्नी नको त्या अवस्थेत आढळून आले. त्याने युवकाला आणि पत्नीला चांगले बदडले. हे प्रकरण पोलिसात गेले आणि शेवटी पोलिसांनी पत्नीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. संजय डोंगरे (३५) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय पीडित महिला टिना (काल्पनिक नाव) पती व सहा महिन्यांच्या मुलासह राहते. पती पेंटिंगची कामे करतो. त्याच्या घराशेजारी त्याचा मित्र संजय राहतो. तो विवाहित असून त्याची पत्नी दोन मुलांसह वेगळी राहते. संजयचे घरी येणे-जाणे होते. यादरम्यान संजयचे मित्राच्या बायकोशी सूत जुळले. पती बाहेरगावी गेल्यानंतर संधी सापडताच दोघेही एकमेकांना भेटत होते. दोघेही शारीरिक संबंध ठेवत होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणालाही कुणकुण नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून दोघांचे प्रेमसंबंध अगदी सुरळीत सुरू होते.

हेही वाचा – नागपूर : प्रकल्प समर्थक नागरिक की भाजपा कार्यकर्ते? कोराडीतील जनसुनावणीवर प्रश्नचिन्ह, विराेधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपला

२६ मे रोजी टिनाचा पती काही कामानिमित्त बाहेरगावी गेला. त्यादरम्यान दोघांत वादही झाला होता. पती बाहेरगावी जाताच संधी साधून रात्री १० वाजता संजय घरी आला. दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि दुसऱ्या दिवशी जेवनासाठी संजयने टिनाला घरी निमंत्रित केले. रात्रीच्या सुमारास टीना घराला कुलूप लावून संजयच्या घरी गेली. दोघांनी जेवन केले आणि एकाच खोलीत झोपले. पहाटे चार वाजता टिनाचा पती आला. त्याला घराला कुलूप दिसले. त्यामुळे एकट्या राहणाऱ्या मित्र संजयकडे थोडावेळ आराम करावा, या उद्देशाने तो संजयच्या घरी गेला. पहाटेच्या सुमारास पती थेट संजयच्या खोलीत शिरला. त्याला पत्नी आणि मित्र नको त्या अवस्थेत दिसले. त्याने बाजुलाच ठेवलेली काठी घेतली आणि दोघांना चांगला मार दिला.

हेही वाचा – नागपूर : उच्चभ्रू घरातील तरुणींमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढले; इंडियन डेंटल असोसिएशनचे निरीक्षण, जागतिक तंबाखू विरोधी दिन आज

पत्नीला घरी नेले आणि विचारणा केली. तिने संजयने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला. आरोप खरा ठरविण्यासाठी त्याने संजयविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याची अट ठेवली. अन्यथा घटस्फोट घेण्याची धमकी दिली. संसार वाचविण्यासाठी तिने संजयविरुद्ध दोन दिवस बळजबरीने बलात्कार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून संजयला अटक केली.