अमरावती : आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या संकल्पनेतून येथील भानखेडा मार्गावर उभारल्या जात असलेल्या १११ फूट उंच श्री हनुमानाच्या मूर्तीशेजारी रामवाटिका वनउद्यान साकारण्यात येत आहे. या वनउद्यानात रवी राणा यांच्या उपस्थितीत रविवारी वृक्षारोपण अभियान सुरू करण्यात आले.
सुमारे दोन वर्षांपुर्वी हनुमान जयंतीच्या पर्वावर स्वत:च्या वाढदिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्यानंतर तत्कालीन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावती शहरालगत श्री हनुमानाची १११ फूट उंच मूर्ती उभारण्याचा संकल्प केला होता. आता या मूर्तीची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून या परिसराला ‘हनुमान गढी’ असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात उंच हनुमान मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. छत्री तलावानजीक उभारण्यात येत असलेली ही मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा संपूर्ण परिसर तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राणा दाम्पत्याने हनुमान गढी स्थापन करण्यासाठी श्री हनुमान चालिसा ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टला त्यांची ५० एकर जमीन दान केली. मूर्तीची उभारणी दोन वर्षांपासून सुरू आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे.
मूर्तीजवळ एक मोठे सभागृह बांधले जात आहे. उंच गॅलरी बांधली जात आहे. ज्यामध्ये भक्तांना श्री हनुमान यांच्या जीवनाचे दर्शन करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. श्री क्षेत्र शेगावच्या धर्तीवर, ५ हजार भाविकांची क्षमता असलेले अन्नछत्र बांधले जात आहे.
रवी राणा यांनी हनुमान गढी येथील रामवाटिका व छत्री तलाव परिसरात युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यासोबत सुमारे ८०० झाडे लावून वृक्षारोपण अभियानाला सुरुवात केली. तसेच शहरात ठिकठिकाणी झाडे लावण्याचा संकल्प सुद्धा यावेळी केला. वृक्ष कसे लावायचे व कसे जगवायचे याबद्दल वनविभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. वृक्षारोपण करतेवेळी सुनील राणा, सहायक वन संरक्षक ज्ञानेश्वर देसाई, वडाळीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, वनपाल बाबुराव खैरकर, प्रशांत पाटील, युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नवले, शैलेंद्र कस्तुरे, माजी नगरसेविका सुमती ढोके, माजी नगरसेवक आशीष गावंडे, मीनल डकरे, अॅड. किरण मिश्रा, नितीन बोरेकर, सचिन भेंडे, राजा बागडे, संजय तीरथकर, मिलिंद कहाळे, विलास वाडेकर, बंडू ठाकरे आदी उपस्थित होते.