बुलढाणा : सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून अन्नत्याग करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सहकाऱ्यांसह आज बुधवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. आज संध्याकाळी त्यांची राज्य सरकार समवेत मागण्यांविषयी बैठक असून या निर्णायक बैठकीकडे लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. रविकांत तुपकरांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज संध्याकाळी ४ वाजता बैठक लावण्यात आली आहे. सह्याद्री अतिथिगृहावर बैठक पार पडणार असून शासनाच्या संबधित विभागाचे सचिव, वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
हेही वाचा : राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार, हे आहे कारण…
रविकांत तुपकरांच्या शिष्टमंडळात दहा पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे निकटवर्तीय सुत्रांनी सांगितले. मंगळवारी दुपारी १ वाजता शेकडो पदाधिकारी , शेतकरी यांच्यासह तुपकर मुंबईकडे रवाना झाले होते. बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जांब या गावी चार वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांची भेट घेतली होती. तसेच २९ तारखेला शासकीय बैठक लावण्यात आल्याने अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र बैठक यशस्वी झाल्यावरच अन्नत्याग मागे घेणार असे तुपकरांनी स्पष्ट केले होते. प्रकृती खालावलेली असतांना ते मुंबईकडे रवाना झाले.