नागपूर : परिवहन खात्यातील आपल्याच सहकाऱ्या विरुद्ध फौजदारी स्वरुपाचा कट रचून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणारे आरटीओ अधिकारी कोणत्या थराला जाऊ शकतात, हे आता समोर आले आहे. या प्रकरणात सीताबर्डी पोलीसांत ५ जणांवर गुन्हा दाखल होऊन दोन दिवस झाले आहेत. मात्र तरीही पोलिसांनी यातल्या एकालाही साध्या चौकशीसाठी पाचारण केलेले नाही, की त्यांना अटकही झालेली नाही. त्यामुळे फौजदारी सारख्या गंभीर प्रकरणांतही कट रचणाऱ्यांना पोलीसच पाठीशी घालत आहेत, का अशी शंका पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.

पदाचा दुरुपयोग करणाऱ्या या ५ आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात नागपुरातील सिताबर्डी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. एखाद्याचा काटा काढण्यासाठी बदलीची बेकायदेशीर योजना कशी आखली गेली, वरिष्ठ अधिकाऱ्याला फसवून बदनाम करण्याचा कट कसा रचला गेला, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून कारकिर्द उध्वस्त करण्याचाही डावही कसा रचला गेला हे आता चव्हाट्यावर आले आहे. मात्र तरीही या अधिकाऱ्यांना अटक न करता सीताबर्डी पोलीस टाळाटाळ करून त्यांना पाठीशी घालत आहेत, का असा सवाल उपस्थित होत आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये महिला अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी आरटीओ अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली गेली. पाटील या चव्हाण यांच्या बॅचमेट होत्या. त्यामुळे त्यांनीही विजय चव्हाणांना लाभ व्हावा म्हणून समितीतील दीपक पाटील यांच्यासोबत खोटा अहवाल तयार केला. हा सर्व गैरप्रकार समितीमधील अशासकीय सदस्या अनिता दार्वेकर यांनी उघडकीस आणला. या संदर्भात न्यायालयात दाखल विविध प्रकरणात पारित आदेशाप्रमाणे रवींद्र भुयार यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे विजय चव्हाण, दीपक पाटील, लक्ष्मण खाडे, हेमांगीनी पाटील आणखी एक अशा पाच जणांवर दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. त्याला दोन दिवस झाले तरीही या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीताबर्डी पोलिसांनी यातल्या एकालाही चौकशीसाठी साधे पाचारण केले नाही, की त्यांच्या अटकेचे धाडस केलेले नाही.

”आरटीओसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असला तरी प्रकरण सध्या तपासावर आहे. त्यामुळे या बाबतीत मी अधिक काही बोलू शकत नाही.विठ्ठलसिंह राजपूत, वरिष्ठ ठाणेदार, सिताबर्डी पोलीस