नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच भाजपच्या एका मोठ्या नेत्याची नातेवाईक कुलगुरूपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती पुढे येत आहे. शर्यतीतील या महिला उमदेवारावर यापूर्वी एका प्रकरणात काही गंभीर आरोप झाले असून हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेल्याचे कळते.नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी तब्बल ७६ उमेदवारांनी अर्ज केले होते. यामध्ये काही कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि माजी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याशिवाय अनेक खासगी अभियांत्रकी महाविद्यालयामधील प्राध्यापकांचाही समावेश आहे.
७६ उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाल्यावर २८ उमेदवारांना सादरीकरण आणि मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. ३ आणि ४ ऑक्टोबरला सादरीकरण झाले. यातून पाच उमेदवारांची नावे कुलगुरू निवड समितीने अंतिम केली आहेत. या पाच उमेदवारांच्या विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल आचार्य देवरत यांच्यासमोर मुलाखती होणार आहेत. यानंतर एकाची कुलगुरू म्हणून घोषणा होणार आहे. या पाच उमेदवारांच्या शर्यतीमध्ये भाजपच्या महाराष्ट्रातील एक मोठ्या नेत्याच्या महिला नातेवाईकाचा समावेश असल्याची चर्चा आहे.
त्यांच्यावर एका प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असतानाही त्यांची अंतिम पाच उमेदवारांमध्ये निवड कशी, असाही प्रश्न चर्चेत आहे. कुलगुरूपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गज असतानाही त्यांना डावलून व राजकीय वजन वापरून या महिला उमेदवाराची निवड होण्याची चर्चाही रंगली आहे.
कुलगुरू बाहेरचे की विद्यापीठातलेच?
मागील काही वर्षांत नागपूर विद्यापीठाला मिळालेले कुलगुरू हे विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयामधील होते. डॉ. श.नू. पठाण यांच्यानंतर बाहेरील व्यक्ती नागपूर विद्यापीठाची कुलगुरू झाली नाही. याउलट २०१४ नंतर राज्यातील इतर विद्यापीठांना नागपूरनेच कुलगुरू दिले. त्यामुळे यंदा नागपूर विद्यापीठाला मिळणारे कुलगुरू हे विद्यापीठातील असणार की बाहेरचे, याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वी डॉ. सुभाष चौधरी हे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. ते खासगी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातून आले होते. त्याआधी डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागात प्राध्यापक होते. यावेळी खासगी महाविद्यालयाऐवजी विद्यापीठात यापूर्वी काम केलेले किंवा विद्यापीठ वर्तुळातील व्यक्तीची कुलगुरूपदावर नियुक्ती व्हावी, अशी अपेक्षा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांकडून व्यक्त केली जात आहे.