नागपूर: कामठी रोडवरील आशा रुग्णालयात एक खांद्याला दुखापत झालेला रुग्ण दाखल झाला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करताच त्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले. हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने झाल्याचा आरोप करत त्यांनी गोंधळ घातला. परंतु, रुग्णालयाकडून रुग्णावर योग्य उपचार झाल्याचे सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बादल सुंदरलाल पाटील (३२) रा. हिवरा रोड, संजीवनी नगर, कांद्री, कन्हान असे दगावलेल्या रुग्णाचे नाव आहे. तो गोंदियातील श्री कृष्णा डायग्नोसिस अँड सिटी स्कॅन सेंटरमध्ये कर्मचारी होता. सात नोव्हेंबर रोजी रात्री पडल्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. ८ नोव्हेंबरला त्यांना कन्हानच्या रुग्णालयात तर ९ नोव्हेंबरला आशा रुग्णालयात दाखल केले गेले. डॉक्टरांनी १ नोव्हेंबरला बादलच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली.

हेही वाचा… महागाईतही नागपुरात ५०० कोटींहून अधिकची उलाढाल… दिवाळीत या वस्तूंकडे कल

शस्त्रक्रियेनंतर अचानक रुग्णाची प्रकृती खालावली. १२ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. पायी रुग्णालयात आलेल्या रुग्णाचा जीव डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत रुग्णांनी रुग्णालयात गोंधळ घातला. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त वाढवल्याने अनुचित प्रकार टळला. याबाबत नातेवाईकांनी न्यू कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या विषयावर प्रसिद्धीमाध्यमाला पोलीस निरीक्षक प्रमोद मोरे म्हणाले, या प्रकरणाची तक्रार आली असल्याचे मान्य करत शवविच्छेदन अहवालानंतरच रुग्णाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.

रुग्णावर नियमानुसार अद्ययावत उपचार झाले. परंतु, इतर गुंतागुंत वाढल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. येथे यापूर्वीही या पद्धतीच्या शेकडो शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहे. बादल पाटील या रुग्णाच्या प्रकरणात डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याचा नातेवाईकांचा गैरसमज आहे. चौकशीत तो स्पष्ट होईल. – डॉ. सौरभ अग्रवाल, संचालक, आशा रुग्णालय.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relatives were enraged because a patient died after surgery in asha hospital on kamthi road nagpur mnb 82 dvr