नागपूर : मुस्लिमांना आरक्षण द्यायचे नाही ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संघाचे संबंधात सगळय़ांना ठाऊक आहे. म्हणजे मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत केवळ बोलत राहायचे पण, प्रत्यक्षात ते मिळू द्यायचे नाही, असा खेळ राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यांनी केली. ते आदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय मेळाव्यासाठी रविवारी नागपुरात आले असता माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, नवाब मलिक यांनी जो मुद्दा उपस्थित केला की, मुस्लिमांना आरक्षण दिल्यास सर्वोच्च न्यायलायाने ५० टक्क्यांची जी मर्यादा घालून दिली, तो मोडीत निघते. वास्तविक न्यायालयाने ५ टक्क्याच्या आरक्षणामुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत असेल त्यांनी ते ग्राह्य धरले आहे. पण, मलिक यांची आणि आरएसएसची भूमिका सारखी आहे. तेव्हा आरएसएस आणि मलिक हे एकाच बोटीत प्रवास करत असल्याचे दिसून येते.

दरम्यान, मेळाव्यात बोलताना त्यांनी गोवारी समाजाने निवडणुकीतून एकजूटता दाखवावी आणि आपल्या समाजाचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवावे, असे आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या समाजाचे प्रतिनिधीच आपले प्रश्न सोडवू शकतात. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्या समाजाचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्याची गरज आहे. त्यामुळे गोवारी समाजाने त्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीतून एकजूटता दाखवावी, असे आवाहन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. ‘अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय भव्य मेळावा’ पासपोर्ट कार्यालयाजवळ न्यू मानकापूर येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.