लोकसत्ता टीम

नागपूर : लोकसंख्या नीतीमध्ये लोकसंख्या वृद्धीदर २.१ पेक्षा कमी होऊ नये असे सांगण्यात आले आहे. शास्त्रही हेच सांगते. त्यामुळे दोन किंवा तीन मुलांपेक्षा कमी मुले झाली तर समाजाचे अस्तित्व टिकणार नाही, असे मत व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली व किमान दोन ते तीन अपत्ये असावे, असा सल्ला दिला.

दक्षिण अंबाझरी मार्गावरील बी.आर.ए. मुंडले शाळेच्या सभागृहात रविवारी कठाळे कुलसंमेलन आयोजित करण्यात आले. कठाळे परिवाराच्या सामाजिक कार्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

आणखी वाचा-काँग्रेस नेते सुनील केदार म्हणाले, “भाजप नेत्यांनी ‘ते’ पुस्तक वाचावे…”

‘दोन किंवा तीन अपत्यांची संख्या समाज टिकण्यासाठी महत्त्वाची आहे. समाजाचे अस्तित्व राहिले पाहिजे अशी सर्वांची भूमिका असते, कारण ते आपले असते. ते किती चांगले किंवा वाईट याचे मूल्यांकन नंतर असते, पण आपले असल्याने ते टिकावे अशी सर्वांची इच्छा असते. यासाठी सर्वांनी दोन किंवा तीनपेक्षा कमी अपत्ये करू नये’, असे मोहन भागवत यांनी सांगितले.

‘अलीकडे जगभर अहंकार, कट्टरता यामुळे भांडणे होत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या संस्कृतीचा प्रसार जगभर करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती जाती, भाषा किंवा क्षेत्रापुरती मर्यादित नाही. आपल्याकडे मूल्यांना प्रथम स्थान दिले गेले आहे. आपल्याकडे व्यक्ती समाजातील प्रमुख घटक नसून कुटुंब आहे. कुटुंब चालवण्यासाठी कुलनीती चालवणे आवश्यक आहे, कारण यातूनच संस्कृती टिकणार आहे’, असेही भागवत म्हणाले. कार्यक्रमात संजय कठाळे आणि उदय कठाळे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. आभार मधुश्री कठाळे यांनी मानले.

आणखी वाचा-नागपूरमध्ये ईव्हीएम तपासणीसाठी या उमेदवारांने भरले तीन लाख रुपये

जातीपातीला शास्त्रात स्थान नाही. मात्र, कुटुंबात तशाप्रकारचे आचरण असल्यामुळे अद्यापही समाजात जातीभेद दिसून येतो. मुळात हिंदू धर्म हे नाव नंतर आहे. सर्व मानवजातीच्या कल्याणाचा हेतू असलेला आपला मानव धर्म फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, असे मत भागवत यांनी व्यक्त केले.