नागपूर: महाराष्ट्र छत्तीसगड आणि नजीकच्या राज्यांमध्ये मागील काही वर्षांमध्ये फुपावलेल्या नक्षलवादावर कठोर कारवाया करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेकडून डाव्या विचारसरणीचा कायम विरोध करण्यात आलेला आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मार्गदर्शन करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नक्षलवादावर झालेल्या कठोर कारवाईवर महत्त्वाचे विधान केलेले आहे. तसेच सरकार आणि प्रशासनालाही आव्हान केलेले आहे.

गेल्या कालखंडात एकीकडे, आपला विश्वास व आशा अधिक बळकट केली आहे. दुसरीकडे, आपल्यासमोरील जुन्या आणि नवीन आव्हानांना स्पष्टपणे अधोरेखित करून कर्तव्याच्या निर्धारित मार्गाबाबत देखील मार्गदर्शन केले आहे. गेल्या वर्षी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याने भारतभरातील भाविकांच्या संख्येच्या तसेच उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या बाबतीत सर्व विक्रम मोडून वैश्विक स्तरावर एक आदर्श प्रस्तुत केला. परिणामतः संपूर्ण भारतात श्रद्धा आणि एकतेची भावना निर्माण झाली.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना त्यांचा हिंदू धर्म विचारून त्यांची निर्मम हत्या करण्यात आली.त्यामुळे संपूर्ण भारतात दुःख आणि संतापाची लाट उसळली. भारत सरकारने नियोजनबद्ध आखणी करून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या कठीण प्रसंगात नेतृत्वाची स्थिरता, आमच्या सशस्त्र दलांचे शौर्य,रणनीती कौशल्य तसेच आपल्या समाजाच्या दृढतेचे, एकतेचे सकारात्मक दृश्य आपण पाहिले.या प्रसंगामुळे आपल्याला हे देखील जाणवले की, सर्वांशी मैत्रीपूर्ण धोरण राबवताना, आपण आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेबाबत अधिकाधिक सतर्क, सक्षम राहिले पाहिजे. या निमित्ताने जगातील सर्व देशांनी घेतलेल्या धोरणात्मक कृतींवरून जगात आपले मित्र कोण आहेत, किती प्रमाणात आहेत याची देखील चाचपणी झाली.

नेमके काय म्हणाले भागवत

सरकार तसेच प्रशासनाच्या कठोर कारवाईमुळे, विचारसरणीतील पोकळपणा आणि क्रूरता अनुभवातून लोकांसमोर आल्याने देशातील अतिरेकी नक्षलवादी चळवळीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता आले आहे. त्या भागात नक्षलवादी उठावाची मूळ कारणे म्हणजे सतत होणारे शोषण,अन्याय, विकासाचा अभाव, सरकार आणि प्रशासनाकडून या मुद्द्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव आता दूर झाला आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाला त्या भागात न्याय, विकास, सद्भावना, करुणा आणि सुसंवाद स्थापित करण्यासाठी एक व्यापक योजना विकसित करावी लागणार आहे.