बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत, तर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत घातक पायंडा पाडला आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या वाहनांवर हल्ले हा याचाच परिपाक आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात वादग्रस्त विधान करणारे आमदार रवी राणा हे पुढील विधानसभेत दिसणार नाहीत, असे भाकीतही त्यांनी केले.

खासदार राऊत यांनी आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. शेगाव येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत मतदारसंघनिहाय चर्चा करून विधानसभा निवडणुकीची अप्रत्यक्षपणे चाचपणी केली. यानंतर प्रसिद्धी माध्यमासोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजप, आमदार रवी राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, विरोधक हे राजकीय वैचारिक प्रतिस्पर्धी नसून ते शत्रू आहेत, असं समजून त्यांच्यावर हल्ले, गुन्हे आणि खटले चालवले जात आहेत. भाजपने देशात हा घातक पायंडा पाडला. पुरोगामी, सुसंकृत महाराष्ट्र राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे अनुकरण करीत असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षांच्या अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड सारख्या आमदारांच्या वाहनावरील हल्ले याचेच द्योतक असल्याचा घणाघात राऊत यांनी यावेळी बोलताना केला.

हेही वाचा – नागपूर भाजप कुटुंबात हे सुरू तरी काय? निलंबित कुलगुरूंमुळे परस्परांविरोधात…

अमरावती जिल्ह्यातील भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. ‘येणाऱ्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला भरभरुन आशीर्वाद दिलात, तर या पंधराशे रुपयांचे तीन हजार रुपये होतील. पण जर आशीर्वाद दिले नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे दीड हजार रुपये परत घेईन, असे खळबळजनक विधान बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले होते. रवी राणा यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावरून आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रवी राणांवर निशाणा साधला.

रवी राणा हे नेहमीच महाराष्ट्राशी ‘मजाक’ करत असतात, अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा झालेला पराभव ही मजाक नव्हती. लोकांनी त्यांना शहाणपणाने केलेले मतदान होते आणि हे जर त्यांनी केलेली मजाक असेल तर हे निवडणुकीसाठी केलेली नौटंकी आहे असा पलटवार खासदार राऊत यांनी यावेळी केला. आमदार रवी राणा हे पुढच्या विधानसभेत नसतील असे भाकीत करून राऊत यांनी पत्र परिषदेत एकच धमाल उडवून दिली.

‘स्टॅण्ड अप कोमेडियन’ मुनव्वर फारुकी याने कोकणी लोकाबद्धल केलेल्या आणि वादाचा विषय ठरलेल्या वक्तव्याबाबत यावेळी खासदार राऊत याना विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले की, हास्य कलाकार मुनव्वर फारुकी याने मराठी माणसाची आणि मालवणी समाजाची जाहीर माफी मागितली आहे. त्यांनी नाक घासले आहे. आमचे बटन कचाकच दाबा, आम्ही तुमच्या घरी स्वयंपाक करू, या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही त्यांची बटणे कचाकच दाबणार आहोत पण त्यांचा दारुण पराभव करण्यासाठी दाबणार आहोत.

हेही वाचा – बुलढाणा : बंडखोरांची आता थेट हकालपट्टी; काँग्रेस प्रभारींची घोषणा

शेगावच्या शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या पत्र परिषदेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख ( घाटा वरील) जालिंदर बुधवत, यांच्यासह दत्ता पाटील, छगन मेहेत्रे, आशिष रहाटे, उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, योगेश पल्हाडे, दिनेश शिंदे, बुलढाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर आदींची उपस्थिती होती.

मतदारसंघ निहाय आढावा

यापूर्वी संत नगरी शेगाव येथे आज मंगळवारी आगमन झाल्यावर सेना नेते संजय राऊत यांनी संत गजानन महाराज मंदिराला भेट दिली. यानंतर ते महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक झाले. यानंतर विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत सहा विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये बुलढाणा, चिखली, मेहकर, जळगाव जामोद, खामगाव आणि सिंदखेडराजा मतदारसंघांचा समावेश होता. त्यांनी क्रमाक्रमाने एकेका मतदारसंघाचा आढावा घेत त्या त्या मतदारसंघांतील पदाधिकारी, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि शिवसैनिकांची मते जाणून घेतली. ठाकरे गटाचा बुलढाणा आणि मेहकर मतदारसंघावर जोर असल्याचे वृत्त आहे.