अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशी लागू झालेल्या चारही विद्याशाखेतील अभ्यासक्रमांना २०२५-२६ या वर्षासाठी अंतिम वर्षात विशेष प्रवेशाची संधी (फुल्ल कॅरी ऑन) देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यासंदर्भात विद्यापरिषदेच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणीमुळे निवड आधारित श्रेयांक प्रणालीत (सीबीसीएस) अंतिम वर्षासाठी प्रवेश पात्रता प्राप्त न करू शकणाऱ्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासात अडथळा निर्माण होणार असल्याने अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही अटीविना अंतिम वर्षात प्रवेश देणे आवश्यक होते. विद्यापरिषदेत विशेषतः अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’ देण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय अत्यंत आवश्यक असल्याचे सभागृहात चर्चेदरम्यान सांगण्यात आले. अशा विद्यार्थ्यांना ‘सीबीसीएस’ संपल्यामुळे समान शैक्षणिक संधी उपलब्ध होणार नाही, ही बाबही सभागृहासमोर मांडण्यात आली.
विस्तृत चर्चेनंतर अंतिम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘फुल्ल कॅरी ऑन’ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विद्यापरिषदेत घेतलेल्या या निर्णयानुसार विद्यापीठाने अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला.
या चर्चेत अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. दिनेश खेडकर यांनी पुढाकार घेत ही अडचण सर्वच विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना येणार असल्याचे नमूद करून ही सुविधा सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना द्यावी असा ठराव सभागृहासमोर ठेवला. या ठरावाला सभागृहाने एकमताने मान्यता दिली.
ज्या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या शिफारसी लागू झालेल्या नाहीत, जसे बीएड, एमएड, एमपीएड, फार्मसी, विधी, बीएसडब्लयू, इत्यादी अभ्यासक्रम वगळून, शिखर संस्थांद्वारे निर्धारित केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून, चारही विद्याशाखांतील ज्या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेले आहेत, अशा सर्व ‘सीबीसीएस’ पद्धतीच्या पदवी अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षासाठीच ‘फुल्ल कॅरी ऑन’ लागू करण्यात आलेला आहे, असे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी सांगितले.
विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय
प्रवेश सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी समोर येतात. त्या अडचणी सोडविण्यासाठी मोर्चे विद्यापीठात येतात. मागील वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विद्वत्त परिषदेची प्रत्यक्ष सभा सुरू असतानाच विद्यार्थ्यांचा मोर्चा धडकला, त्यावेळी कुलगुरूंना सामोरे जावे लागले होते. त्यानिमित्ताने झालेल्या चर्चेत असे मोर्चे येण्याची वेळच येऊ नये, यासाठी विद्यापीठानेच अभ्यासपूर्वक निर्णय घ्यावा, असे सुचवले होते. ‘कॅरी ऑन’मुळे असंख्य विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. – डॉ. दिनेश खेडकर, कोषाध्यक्ष, शैक्षिक महासंघ