यवतमाळ : जिल्ह्यात सोयाबीन कापणी, कापूस वेचणी अशा हंगामाच्या काळात शेतकरी व्यस्त असताना सोमवारी, ३० ऑक्टोबरला शहरात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास ३५ हजार शेतकरी, लाभार्थी उपस्थित राहतील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे. यापूर्वी तीन वेळा हा कार्यक्रम घोषित होऊनही ऐनवेळी रद्द झाला होता. सोमवारी आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहेत, तर अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड राहणार आहे.

हेही वाचा – नागपूर : शहरात ‘ट्रिपल सीट’ चालविणारे सुसाट; वाहतूक पोलिसांचा वचक संपला, नियमांबाबत जनजागृतीची गरज

यवतमाळ शहरानजीक किन्ही या गावाजवळ पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास जवळपास ३५ हजार लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. यातील काही लाभार्थ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रत्यक्ष लाभाचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमस्थळी रोजगार मेळाव्यासह विविध विभागांचे स्टॉलही राहणार आहे. या ठिकाणी लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी येणे व जाण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा – अकोला : भाजपा नेत्यांशी लागेबांधेमुळे विमा कंपन्यांची मुजोरी, काँग्रेस प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणेंचा आरोप

सत्यपाल महाराजांचे कीर्तन

मनोरंजनातून प्रबोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या सत्यपाल महाराजांचे कीर्तन शासन आपल्या दारी या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता महाराजांच्या कीर्तनास सुरुवात होईल.