लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानितच्या पहिली ते आठवीपर्यंत शाळांमध्ये शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शाळांची घंटा १ जुलैपासून वाजणार आहे. १९ एप्रिलच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना २२ एप्रिलपासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिली होती. यासंदर्भात नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनीही पत्र काढून सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना १ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

१८ एप्रिलच्या शिक्षण संचालनालयाच्या पत्रानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी १ मेपासून जाहीर करण्यात आली होती. तर २०२४-२५ या सत्रात विदर्भ वगळता सर्व विभागातील राज्य मंडळाची शाळा शनिवार १५ जूनपासून सुरू करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले होते. विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्य मंडळाच्या सर्व शाळा ३० जून, रविवार येत असल्याने १ जुलैपासून सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात मोफत पाठ्यपुस्तकांमध्ये प्राथमिक स्तरावर पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे.

आणखी वाचा-भाजप नेत्याचा ओबीसी आरक्षणाला जाहीर पाठिंबा…राज्य सरकारला इशारा देत म्हणाले….

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यासाठी शासनाने निधीची तरतूद केल्याचे सांगण्यात आले. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून यंदा राज्यातील शाळांत ही पुस्तके तब्बल एक कोटी दोन लाख ९० हजार ४२० विद्यार्थ्यांना पुरविली जाणार आहे. त्यासाठी तीन कोटी १९ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पीएमश्री शाळांतील एक लाख ३९ हजार १५५ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यंदाही वह्यांची जोडलेली पाने असलेली पुस्तके असणार आहे. ही पुस्तके आता नवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवसापासून मिळावी, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. यावेळी शासनाने शिक्षकांसाठीही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षकांना पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासह वर्ग सजावटी करायच्या आहेत.

आणखी वाचा-अमरावतीत ‘जलजीवन मिशन’च्‍या कामांची संथगती; ६६६ मंजूर योजनांपैकी किती पूर्ण झाल्या? जाणून घ्या…

विविध भाषांतील पुस्तकांची मागणी

पाठ्यपुस्तकांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगू, सिंधी, अरबी, तामिळ आणि बंगाली माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ज्या शाळांकडून पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे ही पुस्तके प्रत्येक शाळांना पुरवली जाणार असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानाकडून देण्यात आली. बालभारतीच्या विभागीय भांडारातून ती तालुकास्तरापर्यंत पोहोचवली जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools in vidarbha will start from july 1 deputy director of education has instructed the teachers dag 87 mrj