नागपूर: म. गांधी आणि विनोबाजींच्या विचाराने प्रेरित होऊन, सतत चालत राहा तरच जीवनाला अर्थ आहे, हाच जीवनाचा खरा आशय आणि खरी शिकवण आहे, असे सांगणारे ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत आणि गांधीवादी नेते मारोतराव मल्हारराव (‘मा.म.’) गडकरी यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२६ एपिल १९३३ ला वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील हिवरा येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेले मा.म. गडकरी म्हणजे, नम्रतेचे पूजक होते. स्वभाव इतका मृदू की, लोक ज्याला व्यवहार म्हणतात, तो त्यांच्या गावीच नाही. समाजातील अखेरच्या माणसाला प्रतिष्ठा आणि जगण्याचा अधिकार मिळावा, ही गांधीजींची इच्छा होती. शेवटापर्यंत ते त्याच विचाराने कार्यरत होते. सेवेसाठी जीवन, हा गांधीजींनी दिलेला विचार त्यांनी जीवनात उतरवला. त्यांनी वकिली केली, विधि महाविद्यालयात अध्यापनही केले. मात्र, रमले ते केवळ गांधीविचार देणाऱ्या संस्थांमध्येच.

वयाच्या बाराव्या वर्षांपासून देशभक्तीची भावना निर्माण झाल्यावर गावातील तुकडोजी महाराजांचे गुरुदेव सेवा मंडळ आणि सुरगाव आश्रमात विनोबाजींसोबत ग्रामसफाई अभियानात ते सहभागी झाले. १९४६ मध्ये वर्धा जिल्ह्य़ातील गांधीजींच्या भाषणाने प्रेरित होऊन विद्यार्थी दशेतच त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे कार्य सुरू केले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि साने गुरुजींच्या विचारांनुसार काम करायचे ठरवून १९६० मध्ये नागपुरात आले. महाराष्ट्र सर्व सेवा संघाचे ते मंत्री व ट्रस्टी होते. सध्या ते सेवाग्राम आश्रमाचे प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र भूदान मंडळाचे अध्यक्ष होते. अ.भा. सवरेदय मंडळ, बापू शिक्षण संस्था, निर्मला देशपांडे यांच्या अ.भा, रचनात्मक समाजचे ते विदर्भ संयोजक, विदर्भ विभागीय भूदानयज्ञ मंडळ, महाराष्ट्र ग्रामनिर्माण मंडळ, महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा समिती, विदर्भ भूदान ग्रामदान सहयोग समिती, मा.बा. गांधी ट्रस्ट, गाडे गुरुजी स्थापित संस्कार परिवाराचे विश्वस्त, आदी संस्थांचे ते पदाधिकारी होते.

सकारात्मक वृत्ती हा त्यांच्या स्वभावातील आणखी एक महत्त्वाचा पैलू. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो, त्यांची दृष्टी नवनिर्मितीचीच असते. विनोबाजींच्या भूदानयज्ञात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. १० मार्च २००८ मध्ये त्यांची सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. सेवाग्राम हे जगाचे विद्यापीठ व अहिंसेचा मार्ग दाखविणारे जगातील प्रमुख केंद्र व्हावे, यासाठी त्यांची धडपड केली होती. आज देशातील गांधीविचारांच्या तरुणांना एकत्र आणणे सुरू केल्यावर अनेक युवक सेवाग्रामशी जुळलेले आहेत आणि तीच त्यांच्या कार्याची पावती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior gandhian thinker marotrao gadkari passed away dag 87 ssb