बुलढाणा : ‘माझ्या जीवाची आवडी! पंढरपूर नेईन गुढी!! आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरवारीचे महत्त्व ज्ञानेश्वर माऊलींनी या सार्थ शब्दात सांगितले आहे. विठूमाऊलीच्या लाखो भक्तांसाठी आषाढीची वारी म्हणजे व्रत, सर्वात मोठा उत्सव. मात्र प्रापंचिक अडचणी, शारीरिक व्याधी, दुर्बलता, वार्धक्य यामुळे सर्वच वारकऱ्यांना पंढरपूर वारीला जाणे अशक्य ठरते. मग त्यांची पाऊले विदर्भ पंढरी शेगाव नगरीकडे वळतात. गजानन महाराजांमध्येच विठूमाउलीचे रूप पाहणारे हजारो भाविक मग संतनगरी शेगावात दाखल होतात.

यंदाची आषाढीदेखील या परंपरेला अपवाद ठरली नाही. शेगाव नगरीत आज रविवारी, ६ जुलै रोजी शेकडो दिंड्यासह पाऊण लाख भाविकांची मांदियाळी जमल्याचे दिसून आले. यामुळे संत गजानन महाराज मंदिर परिसर, मंदिराकडे येणारे विविध मार्ग भाविकांनी नुसते फुलून गेल्याचे दिसून आले. आषाढी एकादशी निमित्त राज्यातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश गुजरात मधून आबालावृद्ध भाविक शेगावात दाखल झाले आहे . हजारो परिवार श्रींच्या दर्शनासाठी आल्याचे दिसून आले.

दर्शनासाठी दीर्घ रांगा

भाविकांची तोबा गर्दी व सुविधा लक्षात घेऊन शनिवारी, ५ जुलैला रात्रभर मंदिर दर्शनसाठी खुले ठेवण्यात आले होते. काल रात्री दर्शनसाठी १ तास लागत होता. मात्र रात्रभर मंदिर सुरु असतानाही आज रविवारी दर्शनसाठी दीर्घ रांगा लागल्याचे दिसून आले. आज सकाळी थेट दर्शनसाठी २ तास तर माध्यान्ह नंतर ३ ते ३.३० तास लागत होता. दूरवरच्या भाविकांचा ओघ सुरूच असल्याने आज रविवारी दिवसभर मंदिर सुरु ठेवण्यात आले.

आषाढी निमित्त गजानन महाराज संस्थान मंदिर तोरण, केळीची पाने, विविध फुलांनी सुशोभीत करण्यात आले शेकडो सेवेकरी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते.

आज सकाळपासूनच आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले . आहे. यामध्ये पहाटे मंदिरामध्ये काकडा भजन दुपारी प्रवचन पार पडले. दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण व्यवस्था करण्यात आली.