नागपूर : भाजपचे विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांच्या कुटुंबातील महिलांचा छळ झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबातील पिडीत महिलेला या राज्यात न्याय मिळत नाहीतर इतर महिलांना काय मिळणार, केवळ लाडकी बहिणीची जाहिरात करून काय उपयोग, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत केला.
त्या म्हणाल्या, पिडीत महिला प्रिया फुके यांनी २०२२ पासून राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ, कारण निवडणुकीनंतर लाडके भाऊ म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. निवडणुकीआधीचे लाडके भाऊ देवाभाऊ यांना पत्र लिहून कुटुंबातील लोकांकडून छळ होत असल्याचे सांगितले. एकदा नव्हेतर तब्बल चार वेळा मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहले आहे. पण, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.
पोलीस यंत्रणांना देखील यासंदर्भात अनेकदा कळवले. पण, पोलिसांनी तिच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. अनेकदा तीन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. पिडीत महिलेने न्याय मागण्याचा हक्क सोडला पाहिजे, असा पोलिसांचा प्रयत्न आहे. या प्रकरणात पोलीस खाते पिडीताला न्याय मागण्यापासून परावृत्त करीत आहे. पोलीस प्रिया फुके यांचा छळ करीत आहे आणि महिला आयोग लक्ष देत नाही. प्रियाने महिला आयोगाला सात पत्र लिहले आहेत. पण, महिला आयोगाने दखल घेतलेली नाही. भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
आमदार फुके यांचा दिवंगत भाऊ संकेत यांची पत्नी प्रिया फुके यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संकेत फुके किडनीच्या आजाराने त्रस्त होते. ही बाब लग्नाच्या वेळी लपवून ठेवण्यात आली. आमचे कुटुंब सधन असून राजकीय दबावाने काहीही करू शकतो. तु शांत राहिली नाहीस तर तुझा आई आणि बहिणीवर अत्याचार करवू, अशी धमकी सासऱ्यांनी दिली. संकेत यांचा मृत्यू सप्टेंबर २०२२ ला झाला होता. त्यानंतर एटीएम कार्ड, बँक पास बुक, दागिणे बळजबरीने काढून घेतले.
अताशा आशीर्वाद बिल्डर्समधील ४० टक्के शेअरर्स परस्पर सासू-सासऱ्याच्या नावाने करवून घेतले, अशी तक्रार प्रिया फुके यांची पोलिसात आहे. याप्रकरणात आमदार फुके यांच्यासह रमेश गोविंदराव फुके (७२), आई रमा फुके (६७), पत्नी परिणिता फुके (४१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. परंतु पोलिसांना आरोपींची साधी चौकशी नाही. त्याउलट पोलीस पिडीत महिलेला समज देत आहेत. प्रकरण निकाल काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. तिच्याविरुद्ध चुकीचे गुन्हे दाखल करीत आहेत, असा आरोप खडसे यांनी केला.
प्रिया फुके यांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे धावून आल्या आहेत. पोलीस फुके कुटुंबीयांना आश्रय देत आहे. तर प्रिया फुके यांना वारंवार चौकशीला बोलावून पीडित महिलांचा छळ करीत आहे, असा आरोप यावेळी केला.