यवतमाळ: जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी असली की, कठीण परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते. वणी तालुक्यातील पुरड (नेरड) येथील शिवाली उलमाले हिने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले. विशेष तिची घरची परिस्थिती बेताची असून वडील सालगडी म्हणून काम करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरची परिस्थितीची जाणीव ठेवत शिवालीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली. अभ्यासासाठी कोणताही शिकवणी वर्ग लावला नाही. तिचे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निवड यादीत नाव झळकले आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. वडील गावातच एका शेतकर्‍याकडे सालगड्याचे काम करतात. शिवाली व तिचा भाऊ अजित या दोघांनाही शिकवून मोठे करायचे असे स्वप्न वडील अनिल उलमाले व आई बेबी यांनी उराशी बाळगले. त्यासाठी आईसुद्धा रोजमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत आहे. शिवाली लहानपणापासून तल्लख बुद्धीमत्तेची होती.

हेही वाचा… चंद्रपूर : शिष्यवृत्ती परीक्षेत चांदा पब्लिक स्कूलची सावनी डिकोंडवार राज्यात अकरावी 

प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर पाचवीपासून ती राजुरा येथे मामाकडे शिकायला गेली. तिथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून मुकुटबन येथील आश्रमशाळेतून उत्तीर्ण झाली. याच कालावधीत गावातील अनुप दुबे हा एमपीएससी उत्तीर्ण होऊन विक्रीकर निरीक्षक म्हणून नोकरीला लागला होता. त्याच्यापासून प्रेरणा घेत एमपीएससी उत्तीर्ण करण्याचे स्वप्न तिने बघितले. यवतमाळातील महाविद्यालयातून बीएस्सी (गणित) पदवी मिळविली. सोबतच एमपीएससीचा अभ्यासही केला. या कालावधीत अनुप दुबे यांच्याकडून मार्गदर्शन घेत राहिली. मैदानी चाचणीसाठी प्रा. दिलीप मालेकर यांचे मार्गदर्शन घेतले. ती आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, भाऊ, पुंडलिक हरणे यांच्यासह मार्गदर्शकांना देते.

अवांतर वाचन महत्वाचे

शिवालीने पहिल्याच प्रयत्नात पूर्व व मुख्य लेखी परीक्षा उत्तीर्ण केली. अभ्यासादरम्यान अवांतर वाचनावर अधिक भर दिला. मुलाखतीसाठी वैभव ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. सर्व टप्पे पार करीत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. तिचा भाऊ अजित हादेखील एमपीएससीची तयारी करीत आहे. परिश्रम करण्याची तयारी, अभ्यासात सातत्य आणि अवांतर वाचन महत्वाचे असल्याचे शिवालीने सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivali ulmale from purad yavatmal cleared the mpsc exam in the first attempt and secured the post of police sub inspector nrp 78 dvr