नागपूर : विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये होणारे आंदोलने आणि यावेळी घडणाऱ्या घटना सर्वश्रूत आहेत. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यात आंदोलन करणारी एक विद्यार्थिनी चक्क कुलगुरूंच्या वाहनासमोर येऊन त्यांना अडवताना दिसते काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूया.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित विविध औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामधील अंतिम वर्षाचे विद्यार्थी प्रवेशाची विशेष संधी (कॅरी ऑन) देण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
गुरुवारी कुलगुरू कार्यालयासमोर दुपारपासून रात्रीपर्यंत आंदोलन सुरू असतानाही विद्यार्थ्यांची कुणीही दखल न घेतल्याने चक्क एका विद्यार्थिनीने कुलगुरूंच्या वाहनासमोर आडवे येत न्यायाची मागणी केली. विशेष म्हणजे, गुरुवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत या विद्यार्थ्यांची मागणी अमान्य करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून अनेक विद्यार्थी संघटनांनी ‘कॅरीऑन’ योजना लागू करण्यासाठी कुलगुरूंना प्र-कुलगुरूंना निवेदने दिली होती. मात्र, विद्यापीठाने ८ जुलै २०२५ रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यादरम्यान गोंडवाना आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने तेथील विद्यार्थ्यांना कॅरीऑन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी मागणी लावून धरत दररोज अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला होता. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी विद्यापीठाने २ ऑगस्टला तातडीची विद्वत परिषदेच्या बैठकीचे आयोजन केले.
Video: आंदोलक विद्यार्थिनी चक्क कुलगुरूंच्या वाहनाखाली झोपली, धक्कादायक व्हिडिओ बघून…https://t.co/2jrmCKvB4K#viralvideo #socialmedia #Student pic.twitter.com/ti9LmBACxZ
— LoksattaLive (@LoksattaLive) September 19, 2025
बैठकीत विद्यार्थ्यांना सरसकट कॅरीऑन न देता, सर्व अभ्यासक्रमातील एक संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामध्ये एम.फार्म., बी.फार्म., बी.एड., एम.एड. आणि बी.पी.एड., एम.पी.एड. या अभ्यासक्रमांना वगळण्यात आले. त्यामुळे आता औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. औषधनिर्माणाशास्त्राच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’ देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी विद्वत परिषदेची बैठक घेण्यात आली. यावेळी या अभ्यासक्रमाला कॅरी ऑन देण्यास सदस्यांनी नकार दिला. त्यामुळे या अभ्यासक्रमाला कॅरी मिळणे अशक्य झाले आहे.