यवतमाळ : यवतमाळ येथे माहेरी आलेल्या एका विवाहितेने आपल्या आठ वर्षीय मतिमंद मुलासह फाशी घेतली. स्थानिक अशोक नगरात शनिवारी रात्री उजेडात या घटनेने खळबळ उडाली आहे. रेश्मा अजय वंडकर (२८) व पूर्वेश अजय वंडकर (८) दोघेही रा.कोल्हेवाडी सिंहगड रस्ता पुणे, हल्ली मुक्काम अशोक नगर यवतमाळ अशी मृतांची नावे आहेत.
रेश्मा आपल्या बहिणीच्या लग्नासाठी यवतमाळ येथे पती व मुलासह आली होती. लग्न पार पडल्यानंतर सर्व परिवार आपल्या कामात व्यस्त झाला. रेश्मा मतिमंद मुलामुळे तणावात होती. त्याला नागपूर येथे मतिमंद निवासी शाळेत टाकण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे ती अधिकच अस्वस्थ होती.
हेही वाचा >>> चंद्रपूर : “ग्रामस्थांनी वाघाला ठार मारले तर…”, वडेट्टीवार म्हणाले,’ वनमंत्र्यांनी…’
मुलाचे कसे होईल या चिंतेने तिला ग्रासले होते. या नैराश्यातच तिने शनिवारीसायंकाळी घरात कोणी नसल्याची संधी साधत प्रथम पूर्वेशला फाशी दिली, त्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच स्वतःसुद्धा फाशी घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतले. रेश्माने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.