नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या बूट हल्ल्याच्या घटनेने न्यायव्यवस्थेत आणि देशभरात संतापाची लाट उसळली. सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना, वकील राकेश किशोर या व्यक्तीने न्यायालयाच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.

या धक्कादायक प्रकारानंतर न्यायालयीन परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. न्यायालयाच्या प्रतिष्ठेवर झालेला हा हल्ला “न्यायपालिकेवरील थेट आक्रमण” असल्याची तीव्र प्रतिक्रिया देशभरातून व्यक्त करण्यात आली. मध्यप्रदेशातील खजुराहो मंदिरातील विष्णू मूर्तीबाबत विधान केल्यामुळे सरन्यायाधीश गवई यांच्यावर हा हल्ला झाला होता. घटनेनंतर सरन्यायाधीश गवई यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ही घटना अत्यंत दु:खद आहे.

न्यायालय हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, त्यावर अशा प्रकारे हल्ला होणे योग्य नाही.” त्यांनी याकडे वैयक्तिक हल्ला म्हणून न पाहता, एक “दुर्दैवी प्रसंग” म्हणून घेतले. गवई यांनी पुढे नमूद केले की, “कोणताही निर्णय सर्वांना पसंत पडेलच असे नाही, पण न्यायालयाच्या निर्णयावर हिंसक प्रतिक्रिया देणे ही न्यायप्रक्रियेची गळचेपी आहे.” या घटनेनंतर बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि विविध राज्य वकील संघटनांनी आरोपी वकिलावर शिस्तभंग कारवाई करत त्याचे सदस्यत्व रद्द केले. सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला झाल्याच्या काही दिवसांनंतरच पुन्हा एकदा भर न्यायालयात बूट फेकण्याची घटना घडली आहे.

नेमके काय घडले?

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर आता गुजरातमध्येही अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदाबाद येथील दिवाणी आणि सत्र न्यायालयात एका व्यक्तीने निर्णय दिल्यानंतर न्यायाधीशांवर बूट फेकून संताप व्यक्त केला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळ उडाला.

ही घटना भद्रा न्यायालय परिसरात दुपारच्या सुमारास घडली. १९९७ साली झालेल्या एका मारहाणीच्या प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीने अतिरिक्त प्रधान न्यायाधीश एम. पी. पुरोहित यांच्या दिशेने आपले दोन्ही बूट फेकले. या प्रकरणात चार आरोपींवर हल्ल्याचे आरोप होते. मात्र, न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. हा निर्णय ऐकताच तक्रारदार आक्रमक झाला आणि न्यायालयातच बूट फेकण्याचा प्रकार घडला.

सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने निर्णयानंतर गोंधळ घालण्यास सुरुवात केली, न्यायाधीशांना शिवीगाळ केली आणि पोलिस तसेच वकिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केल्यावर तो आणखी भडकला. त्याने सलग दोन बूट न्यायाधीशांच्या दिशेने फेकले. सुदैवाने या घटनेत न्यायाधीशांना कोणतीही दुखापत झाली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, न्यायाधीश पुरोहित यांनी त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यास नकार दिला. करंज पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असता, न्यायाधीशांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली.

या घटनेनंतर गुजरात न्यायिक सेवा संघाने तत्काळ न्यायालयीन सुरक्षेच्या बळकटीकरणाची मागणी केली आहे. संघाचे अध्यक्ष एस. जी. डोडिया यांच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध केलेल्या निवेदनात न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी आणि न्यायालयीन इमारतींच्या सुरक्षेसाठी तत्काळ आणि कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपींची त्वरेने ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. संघाने या घटनेचा तसेच काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही तिव्र शब्दांत निषेध केला आहे आणि न्यायव्यवस्थेवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांविरुद्ध ठाम भूमिका घेतली आहे.